सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : “गुरुजींचा” समाजात मानसन्मान वाढवा, यासाठी त्यांचे रंगीत फोटो शाळेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अशाने सन्मान वाढतो, हा गैरसमज असून याला आमचा तीव्र विरोध आहे. यापेक्षा अध्यापनावर अनिष्ट परिणाम करणारे कोणतेही काम शिक्षकांना देणार नाही. असा उपक्रम राबवावा. याकडे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने आज प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहेत.
मा. उपसंचालक शिक्षण कोल्हापूर विभाग यांनी ‘आमचे गुरुजी’ या उपक्रमांतर्गत शाळेमधील शिक्षक शिक्षिका यांनी आपले रंगीत फोटो दर्शनी भागात प्रदर्शित करणेबाबत सूचना दिल्या दिलेल्या आहेत.याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर यांनी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांना निवेदन देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, शिक्षकांना आजही समाजात मानसन्मान आहे. शिक्षकांचे रंगीत फोटो दर्शनी भागात सन्मानपूर्वक लावल्यामुळे शिक्षकांना अधिक सन्मान मिळतो हा गैरसमज आहे. आणि आम्हाला ते पटत नाही. त्यामुळे या उपक्रमास अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग चा तीव्र विरोध आहे. यापेक्षा यापुढे प्राथमिक शिक्षकांना कोणतेही असैक्षणिक कार्य, वेळ काढू ऑनलाईन काम व अध्यापनावर अनिष्ट परिणाम करणारे कोणतेही काम देणार नाही. असा उपक्रम राबवावा. त्याचे आम्ही स्वागत करू. त्यातून शाळेचा आणि पर्यायाने शिक्षकांचा मानसन्मान अधिक वाढेल. अशी आमची धारणा आहे. तरी यासाठी प्रयत्न व्हावे. अशी विनंती निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.