पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे, सागर देवार्डेकर यांची फोंडाघाट चेकपोस्टवर कारवाई
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट चेकपोस्ट येथे ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलिसांकडून वाहनांची तपासणी सुरू असताना कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका कार (mh 09 fb 4078) मध्ये तब्बल 38 लाख 67 हजार 900 रुपयांची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान ही रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी विसंगत उत्तरे दिली. दरम्यान एका कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाची ही रक्कम असल्याची बाब प्राथमिक चौकशीत समोर आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काहींना माल देत असलेल्या मालाची वसूल केलेली रक्कम घेऊन हे दोघेजण जात होते. जीएसटी चुकवून चेक द्वारे पेमेंट न करता कॅश पेमेंट घेऊन अशा प्रकारे जीएसटी चुकवण्याचा हा प्रयत्न असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. सदर रक्कम महसूल विभागाच्या ताब्यात दिली आहे. या चेकपोस्टवर कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे व सागर देवार्डेकर यांनी ही कारवाई केली. दरम्यान या कारवाईनंतर घटनेची माहिती वरिष्ठांना देताच पोलीस उपनिरीक्षक अनिल हडळ व रवींद्र शेगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्रक्रियेंअंती ही रक्कम महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. नितीन बनसोडे यांच्यासहित पथकाने काही दिवसांपूर्वीच खारेपाटण चेक पोस्टवर विनापरवाना बंदुकी सहित शिकाऱ्यांवर कारवाई केली होती. ही कारवाई चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा पोलिसांनी केलेल्या या कारवाईने जीएसटी चुकवून व्यवहार करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.












