बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये 22 जुलै 2024 रोजी शौर्य स्मारकाचें उद्घाटन

कुडाळ (प्रतिनिधी) : बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग या कुडाळ येथील संस्थेस प्राप्त झालेल्या टी ५५ ह्या १९६५ व १९७१ च्या युद्धात रणभूमी गाजवणाऱ्या रणगाड्याच्या शौर्य स्मारकाचे उद्घाटन कारगिल युद्ध गाजवणारे महापराक्रमी योद्धा परमवीरचक्र विजेते सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते होत आहे . दि. २२ जून रोजी दुपारी ३:३०वाजता कुडाळ एम.आय.डी.सी .येथील बॅ.नाथ पै संस्थेच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न होत आहे. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि दैनिक तरुण भारत संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न होणार आहे .

देशभक्ती, देशाभिमान, स्वाभिमान, देशाप्रती कर्तव्याची भावना हे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी बाणावेत, रुजावेत व त्यातून देशाप्रती आदर बाळगणारी तरुण पिढी तयार व्हावी या उद्देशाने बॅ.नाथ पै शिक्षण संस्था ही सदैव प्रयत्नशील असते .याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून या संस्थेने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने भारतीय संरक्षण खात्याकडे केलेल्या मागणीनुसार संरक्षण खात्याने त्यांना १९६५ आणि १९७१ च्या युद्धात प्रचंड पराक्रम गाजवणारा टी -५५ हा रणगाडा दिला होता ,या रणगाड्याचे शौर्य स्मारकात रुपांतर करण्यात आले असून या स्मारकाचे उद्घाटन परमवीरचक्र विजेते सुभेदार योगेंद्र सिंह यादव यांच्या हस्ते होणार आहे आणि याच स्मारक उद्घाटनाचे औचित्य साधत विद्यार्थी व नागरिकांसाठी योगेंद्रसिंह यादव व त्यांच्यासोबत विशेष निमंत्रित करण्यात आलेल्या श्रीमती स्मृती कुचहल यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

ज्या महापराक्रमामुळे अतिउच्च असे परमवीरचक्र प्राप्त झाले तो महापराक्रम “याची डोळा ,याची देही “ऐकण्याची व जाणून घेण्याची संधी विद्यार्थी व नागरिकांना मिळणार आहे.शनिवार दिनांक 22 जून रोजी दुपारी ३:३० वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे यावेळी मान्यवरांनाही निमंत्रित करण्यात आला आहे .कारगिल युद्धात शत्रूच्या ताब्यातील टायगर हिल जिंकून घेताना शरीरात १५ ते १६ गोळ्या घुसल्या असतानाही अभिमन्यू प्रमाणे पाकिस्तानी सैनिकांवर तुटून पडत त्यांना कंठस्नान घालणाऱ्या या बहादूर सैनिकाने टायगर हिल जिंकून दिलं होतं. या टायगर हिलच्या माथ्यावरील घनघोर युद्धात २१ भारतीय जवान शहीद झाले होते. सुभेदार योगेंद्र सिंह यादव यांचा हा पराक्रम युद्ध इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदला गेलाय. या महापराक्रमी योध्याला पाहून- ऐकून विद्यार्थ्यांना नक्कीच नवी प्रेरणा मिळणार आहे आणि नेमक्या याच उद्देशाने त्यांना या शौर्य स्मारकाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने निमंत्रित करण्यात आले आहे.

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेला प्राप्त झालेल्या टी-५५ या रणगाड्याला पराक्रमाचा इतिहास लाभला आहे. या रणगाड्याच्या बाबतीत घडून आलेला योगायोग ही पराक्रमाचा बाब आहे .१९६०ते ७० च्या दशकात अत्याधुनिक आणि घातक या व्याख्येत बसणाऱ्या या रणगाड्याला १९६५आणि १९७१ या दोन युद्धात प्रत्यक्ष सहभागी होऊन पराक्रम गाजवण्याची संधी मिळाली होती. योगायोग हा की १९६५ च्या युद्धात लेफ्टनंट कर्नल एव्हिल लारापोर यांच्या नेतृत्वाखाली या रणगाड्याने पठाणकोट परिसरात पाकिस्तान सैन्यावर घातक हल्ला चढवला होता व शत्रूला पळवून लावले होते .या युद्धात कर्नल लारारोप यांना त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाबद्दल परमवीर चक्र प्राप्त झाले होते तर १९७१ च्या याच युद्धात रणगाड्याने अखनूर रेक्टर मध्ये पाकिस्तानी सैन्यावर प्रतिहल्ला चढवत पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली होती .या १९७१ च्या युद्धात ज्यांच्या नेतृत्वाखाली हा रणगाडा शत्रू सैन्यावर तुटून पडला होता. ते लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांनाही त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाबद्दल अतिउच्च शौर्याचे परमवीरचक्र प्राप्त झाले होते, आणि आता लष्करी सेवेतून मुक्त झालेल्या या रणगाड्याच्या शौर्य स्मारकाचे उद्घाटन ज्यांच्या हातून होत आहे ते सुभेदार योगेंद्रसिंह यादव हे देखील परमवीर चक्र विजते कारगिल युद्धातील महापराक्रमी योद्धा आहेत. हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. तीन परमवीरचक्र विजेत्यांचा सहवास लाभलेला हा रणगाडा बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेला आणि पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त व्हावा यासारखी भाग्याची अन्य दुसरी गोष्ट ती कुठली? तरी देशप्रेमी नागरिकांनी व रसिकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!