आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक दिगंबर महादेव जाधव यांनी सन 2023 / 2024 या वर्षामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये 4049 एवढ्या मनुष्यदिनाची निर्मिती करुन उल्लेखनीय कामगिरी करत मालवण तालुक्यात सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे.
राज्य शासन कृषी विभाग, पंचायत समिती मालवण व सुकळवाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी मेळाव्यात दिगंबर जाधव यांचा चिंदर ग्रामविकास अधीकारी मंगेश साळसकर यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समिती कृषी अधिकारी संजय गोसावी, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, भगीरथ प्रतिष्ठानचे प्रसाद देवधर, कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी मित्र, सुकळवाड ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, कर्मचारी आदी उपस्थित होते.