कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बॅ. नाथ पै नगर येथील रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील खोलीच्या शटरचे लॉक कोणत्यातरी हत्याराने तोडून आतील २ लाख ३४ हजार किंमतीचे तांब्याच्या तारेचे बंडल व कंडक्टरचे तुकडे चोरल्या प्रकरणी कणकवली पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हंबीरराव सावळा गोसावी (४०, रा, कोडोली,ता.पन्हाळा) या भंगार विक्रेत्या संशयिताला अटक केली होती.तसेच गुन्ह्यात वापरलेल्या बोलेरो पिकअप गाडीही ताब्यात घेतली होती. त्याला शुक्रवारी कणकवली न्यायालयात पोलिसांनी हजर केले.यावेळी न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
ही चोरीची घटना २२ जून रोजी सायंकाळी ७.३० ते २४ जून सकाळी ९ या मुदतीत घडली होती. याबाबतची तक्रार त्या वर्कशॉपमधील रेल्वेचे विभागीय वरिष्ठ अभियंता संजीवकुमार बेलवलकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास कणकवलीचे स्थानिक पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि रेल्वे सुरक्षा बलही समांतररित्या करत होते. कणकवलीचे पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ व त्यांच्या सहकार्यांनी या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हा ज्या वर्कशॉपमध्ये घडला तेथून कणकवली शहर ते कोल्हापूर पर्यंत जवळपास १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासले. या फुटेजमध्ये संशयिताने वापरलेली गाडी निष्पन्न झाली होती. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास हंबीरराव गोसावी याला त्याच्या कोडोलीतील घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअपही जप्त करण्यात आली. संशयित हा भंगार विक्री करतो.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.
चोरीच्या घटनेदिवशी त्याच्या सोबत आणखीही काहीजण होते. तेही पोलिसांच्या रडारवर आहेत. सुमारे अडीज लाखाहून अधिक किंमतीचे रेल्वेचे भंगार चोरीस गेल्याने रेल्वे पोलिसांसह सर्वच यंत्रणा चोरट्यांच्या मागावर होती. संशयिताला शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याने चोरी केलेले भंगार कुठे विकले, त्याच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे, त्याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का? याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहेत.