फोंडाघाट (प्रतिनिधी) : जीवन शिक्षण विद्या मंदिर फोंडा नंबर १ मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. सायंकाळी माजी विद्यार्थी मेळाव्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मेळाव्यास बहुसंख्येने माजी विद्यार्थी उपस्थित राहून शाळेप्रती आपले प्रेम व जिव्हाळा व्यक्त केला.यावेळी व्यासपीठावर कणकवली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. किशोर गवस, केंद्रप्रमुख श्री. सुभाष महाले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रेया नानचे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मुख्याध्यापिका सौ. श्रेया नानचे यांनी प्रास्ताविकातून शाळेची प्रगती, उपक्रम व भावी योजना यांचा आढावा घेतला.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत कृतज्ञता व्यक्त केली. काही माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी देणग्या जाहीर करून सहकार्याची ग्वाही दिली. तसेच माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी श्री. वासुदेव सामंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लकुळ गोसावी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. रंजना पाटील यांनी केले.
यानंतर गटशिक्षणाधिकारी किशोर गवस व माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष वासुदेव सामंत यांनी विद्यार्थ्यांचे रांगोळी प्रदर्शन व कला दालनाचेउद्घाटन केले. सायंकाळी ६.३० वाजता विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमास माजी पंचायत समिती सभापती सौ. सुजाता हळदिवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय रेवडेकर,गोपाळ सावंत, राजेश शिरोडकर, माजी विद्यार्थी अध्यक्ष वासुदेव सामंत, संजना आग्रे, वेदांती नारकर,रंजना पाटील,संदीप नानचे, श्रीमती कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्याध्यापिका श्रेया नानचे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला.विविध शैक्षणिक,क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुजाता हळदिवे यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिक परिश्रम,शिस्त व आत्मविश्वास यांच्या जोरावर यश संपादन करण्याचा संदेश देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सायंकाळी ७ वाजता विद्यार्थ्यांचा रंगतदार गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आला.अंगणवाडीतील चिमुकल्यांपासून ते उच्च वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी विविध नृत्य,नाटिका व सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप नानचे व गोसावी सर यांनी समर्थपणे केले.
समारोपप्रसंगी मुख्याध्यापिका श्रेया नानचे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, शिक्षकवृंद, पालक तसेच माजी विद्यार्थी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.संपूर्ण कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि एकोप्याच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.











