नेरूर शासकीय जंगलात ‘सप्तरंगी’ची अवैध तोड; ९६१ किलो मुद्देमालासह एक जेरबंद

वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांच्या पथकाची कारवाई

कुडाळ (प्रतिनिधी) : सावंतवाडी वनविभाग अखत्यारितील कुडाळ परिमंडळांतर्गत नेरूर ता. कुडाळ (पश्चिम) नियतक्षेत्रातील चाफेली वनपरिक्षेत्रामधील शासकीय राखीव जंगलात ‘सप्तरंगी’ या दुर्मिळ औषधी वनस्पतीची अवैध तोड करून तिची मुळे काढून वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला वनविभागाने जेरबंद केले आहे. आरोपीकडून ९६१ किलो वजनाची सप्तरंगी वनस्पतीची मुळे व फांद्या भरलेली २६ पोती जप्त करण्यात आली असून, त्याची अंदाजे किंमत ₹५६,६९९ इतकी आहे.

नेरूर ता. कुडाळ (पश्चिम) येथील कक्ष क्रमांक ९० मध्ये एकूण ९४७.२७ हेक्टर शासकीय राखीव वनक्षेत्र आहे. दि. ३ मार्च २०२६ रोजी वनपाल चाफेली, वनरक्षक नेरूर (पश्चिम), वनरक्षक चाफेली व वनरक्षक पुळास यांनी स्टाफसह रात्री गस्त घालत असताना दि. ४ मार्च रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता कोरड्या नदीपात्रातून डांबरी रस्त्याकडे शिरओझ्याने सप्तरंगी वनस्पतीची वाहतूक करताना विठ्ठल लक्ष्मण लगड याला अडविण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने वनपाल चाफेली यांच्या समक्ष गुन्ह्याची कबुली दिली.

त्यानंतर दोन पंचांसमक्ष पंचनामा करून आरोपीच्या ताब्यातून सप्तरंगी वनस्पतीची २६ पोती जप्त करण्यात आली. रा. गु. क्र. सी-०१/२०२६ नोंदविण्यात आला. पुढील चौकशीसाठी आरोपीला रेंज कार्यालय, कुडाळ येथे आणून जबाब नोंदविण्यात आले. आरोपीने फरार साथीदारांसह संगनमत करून शासकीय राखीव वनात अपप्रवेश करत सप्तरंगी झाडांची तोड करून त्याची मुळे खोदून विक्रीसाठी वाहतूक केल्याची कबुली दिली.पंचांसमक्ष अटक पंचनामा करून आरोपीला अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दि. ५ मार्च २०२६ पर्यंत फॉरेस्ट कस्टडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास वनक्षेत्रपाल कुडाळ एस. एन. कुंभार हे उपवनसंरक्षक मिलिंद दत्त शर्मा व सहाय्यक वनसंरक्षक एस. के. लाड (खा. कु. तो. व वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. तपासात वनपाल संतोष गोरे, वनरक्षक निखिल खोत, शिवाजी पाटील, किरण गोसावी व वनपाल सावळा कांबळे यांचे सहकार्य लाभले आहे. सदर प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर असून या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती वनक्षेत्रपाल श्री.कुंभार यांनी दिली.

error: Content is protected !!