वेंगुर्ला (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील शेतीचा खरा कणा हा विकास संस्था आहेत आणि विकास संस्थेचा खरा कणा संस्था प्रतिनिधी असतात म्हणून खरी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊन पडते आणि या सगळ्या मधून तुमच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी आहोत असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. वेगुर्ला येथील साई दरबार येथील वेंगुर्ला तालुक्यातील बँक व संस्था पातळीवर वसुलीस पात्र कर्जाची १००% पूर्णफेड करणा-या संस्थाच्या सत्कार प्रसंगी मनिष दळवी बोलत होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील संस्थाच्या वसुली कामकाजाचा आढावा घेण्यात आला. परुळे विकास संस्थेचे चेअरमन निलेश सामंत, रेडी विकास संस्थेच्या चेअरमन चित्रा कनियाळकर तसेच क्षेत्रपालेश्वर विकास संस्था, होडावडा सचिव राजबा सावंत यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष दळवी म्हणाले की प्राथमिक विकास संस्थांनी सध्याच्या काळात वेगवेगळ्या संधीचा शोध घेऊन त्या क्षेत्रात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहून त्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम केले पाहिजे ही जबाबदारी येत्या काळात विकास संस्थांची राहील यासाठी आवश्यक ती मदत जिल्हा बँक म्हणून निश्चितपणे करू.
यावेळी व्यासपीठावर नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक दिपाली माळी तालुका निबंध कार्यालयाचे प्रतिनिधी साळगावकर, वेंगुर्ला तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, जिल्हा बँकेचे माजी सरव्यवस्थापक तसेच विकास संस्था संगणकीकरण विभागाचे प्रमुख व्ही. डी. हडकर, वेंगुर्ला तालुक्यातील विकास संस्थांचे अध्यक्ष, संचालक, सचिव व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले.