पोलीस पाटील नसल्याने कागदपत्रांसाठी नागरीकांची होतेय धावपळ
वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा ग्रामस्थांनी केली तातडीने भरती करण्याची मागणी
चौके (प्रतिनिधी) : फेब्रुवारी २०२४ मध्ये म्हणजेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी जिल्ह्यात रिक्त पोलीस पाटील पदांसाठी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी मालवण आणि कुडाळ तालुक्यातील भरती प्रक्रिया निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु वेंगुर्ला ,दोडामार्ग , सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी , देवगड या तालुक्यातील उमेदवारांची तोंडी परिक्षेसह मुलाखत प्रक्रिया चार महिन्यांपुर्वी पूर्ण होऊन अद्याप निवड यादीही जाहीर झालेली नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये पोलीस पाटील नसल्याने नागरीकांची , शालेय विद्यार्थ्यांची पोलीस पाटील दाखल्यांसाठी मात्र तारांबळ उडत आहे.
त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतर सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करून पोलीस पाटील नियुक्त करावे अशी मागणी वेंगुर्ला तालुक्यातील कोचरा गावच्या ग्रामस्थांनी केली आहे. स्थानिक आमदार , खासदार , पालकमंत्री यांनी याचा पाठपुरावा करावा अन्यथा पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा ईशाराही दिला आहे.











