वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात गेले आठ दिवस पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नावळे धनगरवाडा येथील श्रीरंग यशवंत रावराणे यांच्या गोठ्यावर सागाचे झाड पडून गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने गोठ्यात असलेली गाय वाचली आहे.
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. नदी काठाच्या भात शेतीत पुराचे पाणी घुसल्यामुळे भात शेती वाहून गेली आहे. सोमवारी दिवसभर तालुक्यात धुवाधार पाऊस पडत होता. पावसाबरोबरच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रावराणे यांच्या गोठ्यावर सागाचे झाड पडून नुकसान झाले आहे. यामध्ये या शेतकऱ्यांचे सुमारे 30 ते 40 हजाराचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी श्रीमती माळी यांनी केला आहे.











