त्वरित खड्डा बुजवण्याची सामाजिक कार्यकर्ता सुनील नारकर यांची मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : खारेपाटण ते गगनबावडा या राज्य महामार्गावर भुईबावडा फॉरेस्ट ऑफिस समोर भला मोठा खड्डा पडला असून हा खड्डा अपघातांना कारण ठरतो आहे. भुईबावडा येथील सामाजिक कार्यकर्ता तथा उद्योजक सुनील नारकर यांनी पिडबल्युडी चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड तसेच वैभववाडी चे उपअभियंता विनायक जोशी यांना अपघाताला निमंत्रण देणाऱ्या खड्ड्याची वस्तुस्थिती त्यांच्या समक्ष दाखवून दिली.वाहनचालकांना पावसात या खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघात होत आहेत. तसेच वाहनांची हानी होत आहे.वाहनचालकानाही या खड्ड्यामुळे कंबरदुखी सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.त्वरित या भागाची डागडुजी करून खड्डा बुजवा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा नारकर यांनी दिला. कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी नारकर यांच्या मागणीची दखल घेत तात्काळ खड्डा बुजवून घेण्याची सूचना उपअभियंता जोशी यांना केली.