सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 48 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी दिलीप भोगलकर ( रा. आजरा, कोल्हापूर ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधिश डॉ. सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी सरकार पक्षातर्फे यशस्वी युक्तिवाद केला. दोडामार्ग तालुक्यातील कुडासे देवमळा येथील आत्माराम महादेव मेस्त्री यांनी रयत इंडिया ऍग्रो कंपनीकडून आपली व अन्य साक्षीदारांची मिळून 48 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिली होती.या कंपनीचा युनिट मॅनेजर दिलीप भोगलकर याच्यासह सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते ( रा. इस्लामपूर, जि. सांगली ) या त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिलीप भोगलकर याला 4 जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी भोगलकर याने जामीन अर्ज सादर केला होता.त्याला हरकत घेताना सरकारी वकील देसाई यांनी आरोपींनी या गुन्ह्यात घेतलेली रक्कम कोठे वापरली ? त्या रक्कमेतून स्थावर अथवा जंगम मालमत्ता खरेदी केली ? आरोपी क्र 1 आणि आरोपी क्र 2 याना आरोपी भोगलकर याने गुन्ह्यात कोणत्या प्रकारे मदत केली ? आदी मुद्द्यांबाबत तपास करायचा असल्याने आरोपी भोगलकर चा जामीन मंजूर होऊ नये असा युक्तिवाद केला.सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी दिलीप भोगलकर याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ.सानिका जोशी यांनी नामंजूर केला.