नवजीवन महिलांसाठी आरोग्य प्रकल्प आणि आधार प्रकल्पातील सहभागी महिलांकडून स्वातंत्र्यवीरांचा जयजयकार
खारेपाटण (प्रतिनिधी) : कुंडाणे विश्वास नगर या छोट्याशा आदिवासी वस्तीत येथील आदिवासी महिलांनी व बालकांनी आज उत्स्फुर्तपणे महात्मा गांधी झिंदाबाद, भगवान बिरसा मुंडा झिंदाबाद, क्रांतिवीर तंट्या मामा झिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज झिंदाबाद ,शहीद भगतसिंग झिंदाबाद,अरूणा असफअली झिंदाबाद, डाँ.बाबासाहेब आंबेडकर झिंदाबाद, स्वातंत्र्यवीर सावरकर झिंदाबाद , सावित्रीबाई फुले झिंदाबाद अशा जोरदार घोषणा देवून स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणांचा जयघोष करीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना , योध्यांना वंदन केले. पुष्पांजली अर्पण केली.
समता शिक्षण संस्था-पुणे संचालित डाँ.बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण आणि शहरी विकास प्रकल्प धुळे तालुक्यात कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या नवजीवनः महिलांच्या आरोग्यासाठी प्रकल्प आणि जेष्ठ नागरिकांच्या सहभागातील आधार प्रकल्पातील बांधव व वांसतिक वर्गातील बालकांच्या सहभागातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नागरिकांच्या राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या स्वतःचे सर्वस्व अर्पण केलेल्या स्वातंत्र्यवीर व वीरांगणांना अभिवादन कार्यक्रमाचे कुंडाणे विश्वासनगर येथे आयोजन करण्यात आले होते.
समता शिक्षण संस्था पुणे च्या अध्यक्षा प्रा.उषाताई वाघ,संस्थेचे सचिव डाँ.जालिंदर अडसुळे आणि प्रकल्पाच्या समन्वयक प्रा.रचना अडसुळे यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी किसन चौरे यांनी आँगस्ट क्रांतिदिन व जागतिक आदिवासी दिन विशेषांची संक्षिप्त माहिती सांगून हा हे दिन साजरा करण्याविषयीची भुमिका स्पष्ट केली. प्रा.सुनिता पाटील यांनी आदिवासींच्या जीवन वास्तव्या वर आधारीत मेरे सपनों को जानने का हक रे हे गीत सादर केले. बालक बालीकांनी आदिवासी गौरव गीतावर आधारीत नृत्ये सादर केली.
या कार्यक्रम संयोजनात समन्वयक किसन चौरे, कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिता पाटिल व गणेश उफाडे यांची प्रमुख भुमिका राहिली. डाँ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे एमएसडब्ल्यु द्वीतीय वर्षाचे विद्यार्थी रोहण पाडवी, प्रकाश नाईक, मुन्ना पाडवी, नरेंद्र पाडवी यांनी कार्यक्रम संयोजनात मोलाचे सहाय्य केले.













