सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड स्थानकावर ” सावंतवाडी रेल्वे टर्मिनस” असा फलक असावा तसेच टर्मिनस ला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा मधू दंडवते यांचे नाव द्यावे अशी मागणी सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने सचिव मिहीर मठकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन देऊन केली. त्यांनी आपण तपासून पाहतो असे आश्वासन दिले. सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने मिहीर मठकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिले तेव्हा माजी आमदार राजन तेली, माजी सभापती राजू परब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, भाजपचे मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर, गुरू गावकर, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, बंटी पुरोहित व मान्यवर उपस्थित होते. सावंतवाडी टर्मिनस म्हणून भूमिपूजन भाजपचे नेते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत २७ जून २०१५ मध्ये झाले आहे याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. तसेच गाड्यांना थांबा मिळावा म्हणूनही लक्ष वेधले आहे.