मनसे आणि शिवसेना ठाकरे गट कोल्हापुरात वातावण तापले ;राज ठाकरे यांचे बॅनर शिवसैनिकांनी फाडले

कोल्हापुर (प्रतिनिधी) : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. याआधीच मनसे आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटात जोरदार राडा सुरू झाला आहे. राज ठाकरेंच्या बीड दौऱ्यात त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. याला प्रत्युत्तर म्हणून काल मनसैनिकांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या वाहनांवर बांगड्या फेकल्या. दोन्ही पक्षांत हे नवं युद्ध सुरू झालेलं असतानाच याचे पडसाद कोल्हापुरात उमटले आहेत. कोल्हापूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते. शिवसैनिकांनी मनसेचे हे बॅनर फाडले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात काही जण मनसेचे बॅनर फाडताना दिसत आहे.

शनिवारी रात्री ठाण्यात मनसेचे झेंडे फडकवत कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सभेच्या ठिकाणी टोमॅटो फेकले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे यांची सभा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झाली. या सभेआधी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी बांगड्या फेकत आंदोलन सुरू केले होते. परंतु पोलिसांनी सर्व मनसैनिकांनी ताब्यात घेतले. यानंतर सभा झाली. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत.
ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी मनसैनिकांवर हल्लाबोल केला. खरे मर्द असाल तर समोर या, पळून का गेलात असे आव्हान त्यांनी दिले होते. त्यानंतर आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही जशास तसे उत्तर दिले. एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना आधी त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करायचा असतो. दुसऱ्याने काही केल्यानंतर मग शहाणपणा शिकवायला जायचं नसतं. तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही मनसैनिक आहोत असे आव्हान देशपांडे यांनी ठाकरे गटाला दिले.

बीड येथे राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकण्यात आल्या होत्या. तसेच ताफा अडविण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनीही ठाकरेंना जशा तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला होता. त्यानंतर शनिवारच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला. उद्धव ठाकरे व इतर नेत्यांचा ताफा हा ठाण्याकडे येत होता. त्यावेळी महामार्गावर एक मनसेचा कार्यकर्ता उभा होता. वाहने जात असताना या कार्यकर्त्याने वाहनांवर दगड फेकले. तर उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर काही मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेणही फेकले. या घटनेनंतर मनसे आणि ठाकरे गटातील वाद आता आणखी वाढत जाण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!