डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे व पिरामल फौंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे व पिरामल फाउंडेशन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आधार प्रकल्प धुळे’ यांच्याद्वारे नुकतेच श्रीराम मंदिर, मोराणे येथे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पाद्वारे शिक्षण, आरोग्य व रोजगार विषयी जाणीव जागृती कार्यक्रम, कायदे विषयक शिबिरे, अभ्यासिका, कपडा, बँक इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येतात. ग्रामीण भागातील लोकांच्या शैक्षणिक, आरोग्य आणि जीवन जगण्याच्या साधनांच्या उपलब्धते वरती काम करणे तसेच समाजातील वृद्धांविषयी संवेदनशिलता निर्माण करणे, वृद्धांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करणे या उद्देशाने कुंडाणे (वार), उडाणे व मोराणे प्र. लळींग या गावात प्रकल्पाचे काम चालू आहे.
समता शिक्षण संस्थेचे सचिव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पाचे संचालक डॉ. जालिंदर अडसुळे व प्रकल्पाच्या समन्वयिका प्रा.रचना अडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य सुरू आहे. प्रकल्पाच्या कामकाजा दरम्यान वृद्धांच्या आरोग्य विषयक वैयक्तिक प्रश्नांवर चर्चा झाली.त्यावेळी अनेक वृद्धांना उच्च रक्तदाब (बी.पी.) व मधुमेहाचा त्रास असल्याचे समोर आले. यामुळे प्रकल्पांतर्गत आरोग्य शिबिर घेण्याचे ठरविण्यात आले.
सदर शिबिरात मोराणे उपनगर येथील भिल्ल वस्ती आणि पारधी वाडा (आदिवासी वस्ती) येथील प्रकल्प क्षेत्रातील वय वर्षे ६० च्या पुढील ७२ स्त्री-पुरूष जेष्ठ नागरिकांची यावेळी रक्तदाब (बी. पी.) तपासणी, वजन उंची आणि मधुमेहाची तपासणी तसेच वृद्धांच्या आरोग्य विषयक तक्रारी आणि समस्या इत्यादी मोफत तपासण्या व समुपदेशन करण्यात आल्या. रक्तदाब व मधुमेह असणाऱ्या वृद्धांना १ महिन्याची औषधे मोफत देण्यात आली. आरोग्य शिबिरात कविता सेनानी (नर्स) यांनी वृद्धांची रक्तदाब व मधुमेह तपासणी केली. कविता पाडवी यांनी रक्तदाब व मधुमेहावरील औषधे वाटप केली. तर सागर कोळी व सुधाकर देवरे यांनी नाव नोंदणी केली. प्रा. रचना अडसुळे (समन्वयक) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प ) यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. प्रकल्पाच्या माध्यमातून वृद्धांचा आरोग्याचा दर्जा उंचवण्यासाठी प्रकल्पाकडून असे उपक्रम घेण्यात येतात. यावेळी किसनराव चौरे यांनी जेष्ठ नागरिक बांधवांचे स्वागत केले. प्रा. सुनिता पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर गणेश उफाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमात सागर कोळी यांचे मोलाचे सहकार्य होते.













