सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गेली कित्येक वर्षे पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून रखडलेली शिक्षक भरती अखेरीस संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलला नोंदणी केलेल्या संस्थांना 10 उमेदवार पाठविण्यात आलेले आहेत परंतु या भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बी.एड. बेरोजगारांवर मात्र अन्याय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बी एड बेरोजगार उमेदवार आपल्या हक्काच्या नोकरीसाठी पुढे आले आहेत. त्यामुळे स्थानिक बीएड बेरोजगार उमेदवारांनी जनता दरबारात पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले, परंतु शिक्षणमंत्री यांच्या कडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने स्थानिक बीएड बेरोजगार आंदोलन करण्याच्या पवित्रात आहेत. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शाळांच्या रिक्त जागांवर, पवित्र पोर्टल प्रणालीच्या अकर्यक्षमतेमुळे शिक्षक मिळालेले नसताना गेली कित्येक वर्षे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बी.एड बेरोजगार उमेदवारानी प्रामाणिकपणे तुटपुंज्या मानधनावर, काहींनी तर निशुल्क ज्ञानदानाचे मुख्य काम केले आहे. त्यामुळेच राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक मिळाले नसतानाही जिल्ह्याचा निकाल राज्यात सर्वाधिक लागत होता. या निकालामध्ये या स्थानिक बीएड बेरोजगारांनी संस्थांना मदतीचा हात दिला होता आणि ज्ञानदानाचे अविरत कार्य चालू ठेवलेले होते. अडलेल्या परिस्थितीमध्ये ज्या शैक्षणिक संस्थांना स्थानिक बीएड बेरोजगारांनी साथ दिली त्याच शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून उमेदवार आल्यानंतर मात्र स्थानिक बीएड बेरोजगारांना संस्थांकडून निरोपाचा जणू नारळचं दिला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे उमेदवार आता हताश झाले असून आता ज्यांच्या वर आपली बायको मुलं यांची जबाबदारी आहे अशांनी आता कुठे भिक मागायची. एखाद्याने निराशेच्या गर्तेत चुकीचे पाऊल उचलून आत्महत्या केली तर त्यास जबाबदार कोण असा यक्ष प्रश्न समोर उभा झाला आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवार आता ज्या शाळांमध्ये कार्य करत आहेत त्यांना त्या शाळांमध्ये सामावून घेऊन 2024 नंतरची भरती पवित्र पोर्टल च्या माध्यमातून करावी असे बीएड बेरोजगारांचे म्हणणे आहे यातून स्थानिकांना प्राधान्या बरोबर, विद्यार्थ्यांना बोलीभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे हा शासनाचा निर्णय देखील पूर्णत्वास जाईल. अन्यथा बीएड बेरोजगारांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त बी.एड. बेरोजगारांनी दिलेला आहे.












