सिंधुदुर्ग ठाकरे सेनेतील खांदेपालट पक्षाला तारक की मारक ?

भाजपाच्या, शिवसेनेच्या गोटात मात्र खुशीचे वातावरण

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : थेट मातोश्रीवर झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे आणि अनुक्रमे संदेश पारकर यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या, सतीश सावंत यांची कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या तर संजय पडते यांची कुडाळ विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आल्याचे वृत्त आहे. तर अतुल रावराणे यांची सिंधुदुर्ग सहसंपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आल्याचे समजते.जरी अधिकृतपणे ही निवड जाहीर झाली नसली तरी ह्या खांदेपालटात आमदार वैभव नाईक यांचाच वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. मात्र हा खांदेपालट पक्षाला तारक ठरणार की मारक याबाबत जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

मात्र कानोसा घेतला असता ठाकरे सेनेतील या खांदेपालटामुळे भाजपाच्या आणि शिंदेंच्या ताब्यात गेल्या शिवसेना आणि विशेषतः कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या गोटात मात्र खुशीचे वातावरण आहे. जिल्ह्यातील आगामी जिल्हापरिषद, पं स आणि नगरपालिका निवडणूकांच्या तोंडावर ठाकरे शिवसेनेत होत असलेला हा बदल ठाकरे सेनेला कितपत तारक ठरतो हे येणारा काळच ठरवणार असला तरी हा बदल भाजपाला आणि शिंदेंच्या ताब्यात असलेल्या शिवसेनेला मात्र फायदेशीर ठरणार असे राजकीय जाणकार मानतात. संदेश पारकर यांची पाळेमुळे कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यात रुजलेली आहेत. थेट नारायण राणे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढविण्याची धिटाई पारकर यांनी याच मतदारसंघात दाखवली होती.त्यांचा दांडगा जनसंपर्क कणकवली विधानसभा मतदारसंघात आहे.

भाजपातून शिवसेनेत पक्षप्रर्वेश करण्याआधी पारकर यांना कणकवली देवगड वैभववाडी, मालवण च्या 4 तालुक्याचे जिल्हाप्रमुख पद शिवसेनेकडून ऑफर करण्यात आल्याचेही वृत्त होते. मात्र त्यावेळी पारकर यांनी भाजपा सोडली नाही आणि जेव्हा राणे भाजपात गेले तेव्हा राणेविरोध म्हणून पारकर शिवसेनेत आले.पारकर यांच्याकडे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख पद देण्यात आल्यामुळे साहजिकच कणकवली विधानसभा मतदारसंघाशी असलेला संदेश पारकर यांचा संपर्क कमजोर होणार हे निश्चित आहे.त्यातच कणकवली नगरपंचायत ची निवडणूक तोंडावर आहे याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. अतुल रावराणे यांनीही कणकवली विधानसभा निवडणूक लढवलेली आहे. कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यात अतुल रावराणे यांनी आपले कार्यकर्त्यांचे चांगले नेटवर्क उभारले . राणे विरोध हा अतुल रावराणें चा कॉमन फॅक्टर असल्याने त्यांनीही भाजपातून शिवसेनेत उडी घेतली.

कणकवली विधानसभा मतदारसंघात पदरमोड करून नेटवर्क उभारलेल्या अतुल रावराणेंना सहसंपर्कप्रमुख पदी नेमत एकप्रकारे त्यांना पक्षात कॉर्नर केल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे.कारण ठाकरे शिवसेनेत जिल्हापातळीवर निर्णयप्रक्रियेत महत्वाची भूमिका ही जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख यांची असते. त्यामुळे मागील काही महिने पक्षप्रक्रियेत काहीसे बाजूला असलेल्या अतुल रावराणेंना सहसंपर्कप्रमुख पद देऊन रावराणेंची असलेली अप्रत्यक्ष नाराजी दूर होणार काय ? हा प्रश्नच आहे. ऐन विधानसभा निवडणुकीआधी सतिश सावंत यांनीही राणेंची साथ सोडून शिवसेनेत दाखल होत नितेश राणेंविरोधात निवडणूक लढवली.

कणकवली विधानसभा मतदारसंघातून संदेश पारकर, अतुल रावराणे हे इच्छुक उमेदवार असतानाच शब्दपूर्ती करत पक्षश्रेष्ठींनी सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आणि पारकर, अतुल रावराणे यांनी सावंत याना साथ दिली. आता शिंदे गटाकडे पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव गेल्यावर सिंधुदुर्गातील ठाकरे शिवसेनेत नाही म्हटलं तरी अस्वस्थ हलचल आहेच. त्यातच नव्याने झालेले खान्देपालट हे पक्षहीत साधण्याऐवजी पक्षाला मारक ठरण्याचीच चिन्ह असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

error: Content is protected !!