वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील स्टाॕलधारक महिलांचे उपोषण सलग दुसऱ्या दिवशीही सुरु आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांकडे कोणीही फिरकलेले नाही. तीन महिलांची तब्बेत खालवली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नगरपंचायतीच्या स्टॉल हटाव मोहिमे विरोधात स्टॉलधारक महिलांचे गेले दोन दिवस तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे.
नगरपंचायतीने वैभववाडी शहरातील अनधिकृत स्टॉल वीस दिवसापूर्वी हटविले असून स्टॉल हटवल्यानंतर या महिलांसमोर रोजी रोटी चा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्वच महिलांनी जागतिक महिला दिन मार्चपासून उपोषण सुरू केले आहे. बुधवारी रात्री उशिरा वैभववाडी तहसीलदार श्री.चव्हाण यांनी उपोषणावर तोडगा काढण्यासाठी वीस दिवसाचे मुदत देऊन त्यानंतर आपण या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे लेखी पत्र देण्याचे कबूल केले.
मात्र उपोषणकर्त्या महिलांना ते मान्य नसून प्रशासनाने यावर ताबडतोब निर्णय घेऊन आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा. अशी भूमिका घेतली.त्यामुळे बुधवारी रात्रभर महिला उघड्या मंडपात डासांच्या त्रासात रात्र काढावी लागली.
गुरुवारी मात्र या उपोषणकर्त्या महिलांकडे राजकीय पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी व इतर कोणीच फिरकले नाही. त्यामुळे महिला चांगल्या संतप्त झाल्या असून या सर्वांच्या विरोधात शिमगा करीत आहेत. स्टॉलधारक महिलांचे पुनर्वसन झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी थांब भूमिका घेत रात्री उशिरापर्यंत उपोषण सुरू होते.
उपोषणकर्त्या महिलांपैकी तीन महिलांचे प्रकृती बिघडली यातील एका 80 वर्षीय महिलेला कोल्हापूर येथे नेण्यात आले. तर एका महिलेला वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून सलाईन लावून उपचार करण्यात आले. थोडे बरे वाटल्यानंतर सदर महिला पुन्हा उपोषणात बसली आहे. उपस्थित महिलांपैकी बऱ्याच जणांना बीपी शुगर चा त्रास असून गोळ्या औषध बरोबर घेऊन त्या उपोषणात सामील झाले आहेत.