विमान प्रवास ! आशाताई, अंगणवाडी सेविकांना रक्षाबंधन भेट

वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांची लाडक्या बहिणींना अविस्मरणीय भेट

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : विमानप्रवास हे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील मोठे स्वप्न असते. कणकवली तालुक्यातील वारगाव ग्रामपंचायत चे उपसरपंच नारायण उर्फ नाना शेट्ये यांनी वारगाव गावातील अंगणवाडी सेविका आणि आशाताईंना गोवा ते मुंबई हा विमानप्रवास स्वखर्चाने घडवला आणि रक्षाबंधनाची अनोखी भेट आपल्या लाडक्या बहिणींना दिली. उपसरपंच नाना शेट्ये यांनी गावातील आशाताई आणि अंगणवाडी सेविका मिळून 6 ताईना स्वखर्चाने हा विमानप्रवास घडवला. वारगाव गावातून गोवा विमानताळपर्यंत खाजगी वाहनाने त्यांना पोचविण्याचीही व्यवस्था स्वखर्चाने नाना शेट्ये यांनी केली.विशेष म्हणजे कुठलाही गवगवा न करता नाना शेट्ये हे गावातील समाजहित साधणाऱ्या कष्टकरी वर्गासाठी नेहमीच अनोखे उपक्रम राबवत असतात. सध्या राज्यात लाडकी बहीण ही योजना चर्चेत असतानाच उपसरपंच नाना शेट्ये यांनी सर्वसामान्य आर्थिक स्थिती असलेल्या परंतु समाजासाठी असामान्य कार्य करणाऱ्या वारगाव गावातील आशाताई आणि अंगणवाडी सेविकांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासाची अविस्मरणीय भेट दिली. स्वप्नवत असलेला विमान प्रवास केल्यानंतर आशाताई आणि अंगणवाडी सेविका भारावून गेल्या होत्या. आशाताई आणि अंगणवाडी सेविका ह्या शासनाच्या सर्व योजना आणि उपक्रम राबविण्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करतात, प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ निःस्वार्थीपणे मिळवून देतात. म्हणूनच त्यांना गावचा उपसरपंच म्हणून भाऊ या नात्याने विमान प्रवासाची रक्षाबंधन भेट दिल्याची प्रतिक्रिया नाना शेट्ये यांनी दिली.

error: Content is protected !!