ग्रामीण कलाकारांना शासनाचे पाठबळ अत्यावश्यक — कलाकारांची अपेक्षा !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कोकणातील कलेला तोड नाही. मग ती चित्रकला असो, अथवा शिल्पकला ! वर्षातील सात-आठ महिने नोकरी, मोलमजुरी, रंगकाम, शेती इत्यादी मध्ये व्यस्त असलेले कलाकार, गेले तीन-चार महिने भूक- तहान हरपून गणपती मूर्ती बनविण्यात मग्न असतात. लोरे नंबर दोन मांजरकरवाडी मधील डोंगरे- मांजलकर कुटुंबीय त्यापैकीच एक ! वर्षभर आपला उद्योग- उदीम सांभाळत, गणेश मूर्ती घडवतात. फोंडाघाट, हरकुल, लोरे, अचीर्णे, कणकवली पर्यंत ते तयार मूर्ती चतुर्थीच्या अगोदर प्रत्येकाचे घरी पोहोच करतात. त्यांना त्यांची सोनाली हायस्कूल येथे आर्ट शिक्षकेची सेवा देणारी मुलगी, मयुरी जन्मजात चित्रकार असून तिची आधुनिक हुबेहूब,मनमोहक आणि नेत्रसुखद चित्रे चित्रदर्दी ना भुरळ पाडतात. एम. आर्ट्स या नावानेही ती सोशल मीडियावर व्यस्त असते.त्यामुळे गणेश रंगकामात मयुरीचा वावर कुटुंबीयांचे मनोधैर्य उंचावणारे तर तिची गणेश नेत्र-लेखाई तर शिल्प हुबेहूब जिवंत करते. सध्या त्यांच्या चित्र शाळेत ६० ते ७० गणेश मूर्ती साकारल्या जातात …
गेली १४ वर्षे फोंडाघाट बाजारपेठेत राधाकृष्ण मंदिरामध्ये पूर्वीचे तायशेटे यांची चित्रशाळा, त्रिमूर्ती आर्ट्स या नावाने भावेश गोसावी, सचिन पाटकर, हे मित्रवर्य विनायक कुशे ,गौरेश साळुंखे, हर्षल गाडे ,तुषार पाटील यांचे सहकार्याने चालवीत आहेत. सुमारे १०० गणेश मुर्त्या ते साकारतात. यातील विनायक कूशे याने चित्रकलेतील पदवी संपादन केली असून गेली दोन-तीन महिने हे सर्वजण विविध प्रकारच्या गणेश मुर्त्या साकारण्यात मग्न आहेत. अशाच प्रकारच्या पंधरा-वीस मुर्त्या बनविणाऱ्या वाडी वाडीवरील चित्रशाळांमध्ये रात्री जागविल्या जात आहेत.यामध्ये उतारावरील गोसावी यांची चित्रशाळा रंगकाम आणि शिल्पकाम अभ्यंगतांचे लक्ष वेधून घेत आहे .कोणतेही शिक्षण- डिप्लोमा नसताना केवळ सरावाने मुर्त्या बनविणे आणि त्यांचे सुबक काम करणारा हा ग्रामीण भागातील कलाकार शहरी व्यावसायिकांच्या तोडीस तोड ठरतो, हे या उत्सवातून सार्थ होते ….
याबद्दल ग्रामीण भागातील या कलाकारांशी संवाद साधताना ते भरभरून बोलतात. तसेच आपल्या व्यथा आणि समाधानाही बोलून दाखवतात.वाड – शेजारील जेष्ठ कलाकारांकडून अभ्यासलेला, सरावाने संपन्न शिल्प-रंगांचा वारसा याबद्दल येणारी नवीन पिढी उरासेन असल्याची खंत हे व्यक्त करतात. परिस्थिती, मोलमजुरी,शेतीतील आपत्ती यांचेशी झगडत विघ्नहर्ताची मूर्ती आकारताना आणि मुर्त्या घडविल्यानंतर स्वर्गप्राप्तीचे सुख त्यांच्या समावेत लाभते, अशी त्यांची धारणा आहे.मात्र मध्ये सोडून जाणारे सहकारी हा मोठा अडथळा ठरतो. वाढणारी महागाई आणि अपवादात्मक ग्राहकांची कंजूषी दुःखदायक ठरते. माती- रंग- ब्रश- लेखन इत्यादी साहित्यांचे दर प्रतिवर्षी वाढत आहेत, यावर प्रशासनाचा अंकुश असणे गरजेचे आहे. म्हणजे कमी मानधनांमध्ये मूर्ती ग्राहकांपर्यंत पोहोचविणे शक्य होईल .कलाकार- कामगारांसाठी शासनाची योजना रेंगाळल्याने अथवा ग्रामीण भागात न पोहोचल्याने कित्येक वंचित आहेत. मयुरी- विनायक सारख्या कलाकारांच्या कलेला व्यासपीठ नसल्याने भविष्य अंधार्मय आहे.याकडे शासनाच्या संबंधित विभागाने,त्यामधील अधिकाऱ्यांनी शोध घेऊन पाठीवर ऊर्जेची थाप मारणे आवश्यक आहे. तरच गणेशोत्सव- दुर्गाष्टमी मधील शिल्पकलाकारांना सुगी चे दिवस येतील. अशी अपेक्षा ग्रामीण भागात या निमित्ताने व्यक्त होत आहे.अन्यथा गणपती येतील– कौतुकही होईल– अन अकरा दिवसांनी– सर्वांना विसर सुद्धा पडेल ! हेच वास्तव्य आहे….













