बांदा (प्रतिनिधी) : आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा (उच्च माध्यमिक) निकाल 92.30 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकूण १३ विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल उच्च राहिला आहे. या परीक्षेत अनुश्री आल्हाद नाईक हिने ४८३ गुण (८०.५० टक्के) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. रेशमा कृष्णा लमाणी हिने ४३६ गुण (७२.६७ टक्के) मिळवून द्वितीय तर श्रेया रामदास नाईक हिने ४२६ गुण (७१ टक्के) मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. इतर विद्यार्थ्यांनीही चांगले गुण मिळवत शाळेची परंपरा कायम राखली. विषयानुसार निकालही समाधानकारक असून बहुतेक विषयांत उत्तीर्णतेचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक राहिले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोसचे अध्यक्ष नीलेश परब, उपाध्यक्ष संजू पांगम, सचिव शांताराम गावडे, सहसचिव सिद्धेश नाईक, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, शिक्षकवृंद तसेच पालकांनी त्यांचे कौतुक केले. मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.













