सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : १ जुलै २०२४ या अहर्ता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी शुक्रवारी जिल्हा निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली आहे. यात लोकसभेपेक्षा सात हजार ४८७ मतदारांची वाढ होवून एकूण मतदार संख्या ६ लाख ७२ हजार ५३ एवढे मतदार झाले आहेत. पुरुषांपेक्षा ३ हजार ६७२ महिला मतदार जास्त आहेत. तृतीय पंथी एकच मतदाराची कणकवली विधानसभा क्षेत्रात नोंद झाली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांनी दिली.
याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी दालन शेजारील बैठक सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना शेवाळे यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. यात नवीन मतदार नोंदणी करणे. दुबार आणि मयत मतदार वगळणे. मतदारसंघ बदल करणे. फोटो बदल, नावात बदल तसेच पत्ता बदल अशी कार्यवाही या कार्यक्रम अंतर्गत करण्यात आली आहे. त्यानुसार ही संख्या निश्चित करून अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. लोकसभेला असलेल्या मतदारांतील ६ हजार ९७२ मतदार वगळण्यात आले आहेत. तर नव्याने ११ हजार ९७२ मतदार नोंदीत झाले असल्याचे त्यांनी सांगितले.












