शिवाजी विद्यापीठाचे शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र

सारथी उपकेंद्रामध्ये मोडिलिपी प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार

लक्षित गटातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार मोडीलिपी प्रशिक्षण

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : सारथी संस्थेमार्फत लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प राबविण्याच्या हेतूने गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सारथी उपकेंद्र कोल्हापूर यांच्यामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प २०२४-२५ राबविण्याबाबतचा सामंजस्य करार शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात पार पडला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, सारथी संस्थेच्या अपर जिल्हाधिकारी, तथा सह-व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाचे विभाग प्रमुख डॉ.अवनिश पाटील, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप, सारथी संस्थेच्या संशोधन अधिकारी नयन गुरव व प्रकल्प अधिकारी दिपक पाटील उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळातील काही साहित्य मोडीलिपी मध्ये उपलब्ध आहे. महाराजांच्या कार्यकाळातील कोल्हापूर संस्थानामध्ये पारित ठराव, प्रशासकीय अहवाल, धोरणात्मक निर्णयांचे गॅझेट्स इ. मधील काही दस्तावेज हे मोडी लिपीमध्ये आहेत. हे अहवाल प्रकाशित करण्यासंदर्भात सारथीकडून प्रयत्न केले जात आहेत.

या प्रकल्पान्वये शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र येथे एकूण ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत मान्यता देण्यात आली असून या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याबाबत सारथी संस्थेच्या संकेतस्थळावर सरसेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प २०२४-२५ साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे मुख्यालयाच्या बाहेरील कागदपत्रे छाननीद्वारे अंतिमरीत्या निवड झालेल्या उमेदवारांना प्रती विद्यार्थी प्रती माह १० हजार रुपये विद्यावेतन अनुज्ञेय होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची रक्कमही सारथी संस्थेमार्फत केली जाणार आहे. अशी माहिती सारथी उपकेंद्र कोल्हापूरचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी केले आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील दिनांक २५ जून, २०१८ रोजी कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अन्वये स्थापन करण्यात आलेली नॉन-प्रॉफिट कंपनी आहे. महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा – कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता या कंपनीची स्थापना करण्यात आली असून वरील लक्षित गटातील समाज घटकांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याच्या अनुषंगाने सारथी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात.

सारथी संस्थेच्या उद्दिष्टांपैकी एका उद्दिष्टानुसार राजर्षी छत्रपती शाहू महाराज व त्यांच्या जीवनकार्याशी संबंधित वैयक्तिक कागदपत्रे, विविध आदेश व इतर ऐतिहासिक कागदपत्रे मिळवणे, त्यांचे जतन व देखभाल करणे व ते जनतेसाठी प्रसिद्ध करणे” हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून यानुसार छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणे, त्यांच्या जीवनकार्याशी संबंधित सर्व व्यक्तिगत ऐतिहासिक दस्तऐवज जतन करणे, तसेच त्यांची राज्यकारभार संबंधित आज्ञापत्रे व मार्गदर्शनपर आदेश यांचे संकलन व संरक्षण करणे, संशोधन व डॉक्युमेंटेशन प्रकल्प हाती घेणे तसेच त्यांचे प्रकाशन करणे इ. कार्य प्रस्तावित आहे. यानुसार हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!