कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील एक हजार ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे’ उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे दिनांक 20 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 36 महाविद्यालयामधील केंद्रांचा समावेश आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. यावेळी त्यांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामधून युवक युवतींना रोजगारक्षम बनवा, असे आवाहन केले.
ते म्हणाले, कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यांमधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. शिक्षणासोबतच यातून विद्यार्थ्यांना कौशल्याचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी 20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन उद्घाटन होणाऱ्या सर्व 36 महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. बैठकीत सहायक आयुक्त कौशल्य विकास यांनी या केंद्राच्या स्थापनेबाबत उपस्थितांना माहिती दिली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या बैठकीत संबंधित प्राचार्यांना आदर्श प्रशिक्षण भागीदार होण्याचे आवाहन केले. सर्वच केंद्रांना फाईव स्टार रेटिंग मिळेल यासाठी प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने महाविद्यालयातून बाहेर पडताना कौशल्यपूर्ण बनवून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी मदत करा. शक्य असल्यास महाविद्यालयाच्या बाहेरील मुलांनाही केंद्रामध्ये प्रवेश देऊन प्रशिक्षित करा, असे निर्देश त्यांनी उपस्थितनांना दिले.
दिनांक 20 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन होणाऱ्या उद्घाटन प्रसंगी सर्व 36 ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. त्या कार्यक्रमाची तयारी चांगली करुन कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संगीता खंदारे यांनी मार्गदर्शक सूचनानुसार कार्यक्रम आयोजनाचे तपशील उपस्थितांना सांगितले.