एलसीबी सह स्थानिक पोलिसांनी लावला चोरीचा छडा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोस्ट ऑफिसमध्ये 11 सप्टेंबर रोजी झालेल्या तांत्रिक उपकरणांची झालेली चोरी एलसीबी सह कणकवली पोलीस ठाण्यातील स्थानिक पोलिसांनी दोन दिवसांत उघडकीस आणली. 11 सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते सव्वा नऊ च्या दरम्यान कणकवली पोस्ट ऑफिसमध्ये कॉम्प्युटर माउस, की बोर्ड सह स्कॅनर ची चोरी झाली. भर बाजारपेठे त असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये झालेल्या चोरीने खळबळ माजली होती. 1200 रुपयांचा स्कॅनर, 400 रुपयांचा की बोर्ड, 100 रुपयांचा माऊस असा एकूण 1 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.या चोरीची फिर्याद कणकवली पोस्ट ऑफिस चे पोस्ट मास्तर गिरीश कामत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात 12 सप्टेंबर रोजी दाखल केली होती. कामत यांच्या फिर्यादीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात बी एन एस 305 e नुसार गुन्हा दाखल झाला होता. ही चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती.सीसीटीव्ही मधील फुटेज नुसार चोरी करणाऱ्या चा शोध कणकवली पोलीस ठाण्यातील स्थानिक पोलीस तसेच एलसीबी चे पीएसआय आर बी शेळके यांचे पथकाकडून सुरू होता. चोरी करताना घातलेल्या प्रिंटेड टी शर्ट च्या आधारे एलसीबी च्या पथकाने चोरट्यांचा माग काढला असता चोरी करणारे कणकवली रेल्वे स्टेशनलगत च्या परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी करता दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्या दोन्ही विधिसंघर्ष बालकांकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण पार्सेकर करत आहेत.