वैभववाडी (प्रतिनिधी) : रेल्वे प्रवास करणाऱ्या महिलेचे दोन लाख तेवीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. शुक्रवारी मुंबईकडे जाणाऱ्या सावंतवाडी दिवा पॅसेंजर गाडीत वैभववाडी रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. याबाबत गोविंद शंकर लाड रा. कुरंगावणे ता. कणकवली यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गौरी गणपती सनासाठी लाड कुटुंब गावी आले होते. शुक्रवारी ते मुंबई कडे जाणाऱ्या दिवा पॅसेंजर ने वैभववाडी रेल्वे स्थानकावरून परतीचा प्रवास करीत होते. प्रवासापूर्वी त्यांनी दागिन्यांचा डबा पत्नीच्या पर्स मध्ये ठेवला होता.वैभववाडी रेल्वे स्थानकावर गाडी आली असता गर्दीतून त्यांनी गाडीत प्रवेश केला. त्यानंतर राजापूर स्थानक येण्यापूर्वी दागिन्याच्या डब्याची खात्री केली मात्र पर्स मधील डबा गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.आज्ञताने सोन्याचे दागिने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी राजापूर येथे उतरून वैभववाडी पोलीस ठाणे गाठले.
लाड यांच्या चोरी झालेल्या दागिण्यामध्ये 32 ग्रॅमचे मंगळसूत्र, 12 ग्रॅमचा नेकलेस, 15 ग्रॅमची चैन, 12 ग्रॅमचे ब्रेसलेट, 3 ग्रॅमची अंगठी,4.51 ग्रॅमचे कानपट्टी, 10 ग्रॅमची माळ, 5 ग्रॅमची चैन, पडल व नथ असा 2 लाख 23 हजारचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत.चोरट्याने रेल्वेतील गर्दीचा फायदा घेऊन दागिन्यांवर डल्ला मारला आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सिसिटीव्ही फुटेज ची तपासणी केली आहे. अधिक तपास महिला हवालदार प्रीती शिंगारे करीत आहेत.