सासोली जमीन घोटाळा प्रकरणी ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाला आप चा पाठिंबा

ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची भूमिका योग्यच – आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर

कणकवली (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे धनदांडग्यांनी केवळ ३५० एकर जमीन खरेदी केली असताना ८०० एकर जमीन बळकावली आहे. यासाठी महसूल, पोलीस, वन, भूमी अभिलेख व ग्रामपंचायत प्रशासन कंपनीला मदत करत आहे. त्यामुळे या विभागातील दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. कंपनीच्या गैरव्यवहारावर ईडीची चौकशी लावावी. अन्यथा २४ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला असून या आंदोलनाला आम आदमी पक्ष सिंधुदुर्गचा पाठिंबा असल्याचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी जाहीर केले आहे.

सासोली येथील सर्व्हे क्रमांक १५७, १६७, १७१, १९७, १९८, १९९, २०१, २०३ या सामाईक मिळकतीत काही धनदांडग्यांनी जमीन खरेदी केली. मात्र, काही ग्रामस्थांनी या सर्व्हे नंबरमधील जमीन न विकल्पाने त्यांचा हक्क अबाधित आहे. या सहहिस्सेदारांना महसूल प्रशासनाने कोणतीही नोटिस न पाठवता धनदांडग्यांना अकृषिक सनद दिली. त्यांच्या संमतीशिवाय तसेच सातबारा स्वतंत्र झाल्याशिवाय सनदा देता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी या विरोधात उपोषण केले. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. सरपंच, ग्रामसेवक यांनी दिलेल्या खोट्या दाखल्यांमुळे हा सर्व प्रकार घडला आहे. तत्कालीन तलाठ्याने खोटे पंचनामे केले. इतकेच काय तर पोलिसांनी देखील ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल केले. भूमी अभिलेखचे अधिकारी देखील यात सामील आहेत. भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी करण्यासाठी मयतांना नोटिस पाठवल्या व त्यांना पोहोच झाल्या देखील. जर मयतांना नोटिसा पोहोच होत असतील, तर मोजणी अधिकाऱ्यांने नेमके काय केले असा प्रश्न आहे. त्यामुळे या सर्व प्रकारात घोटाळा झाला असून याबाबत शिवसेनेची भूमिका शेतकऱ्यांना न्याय देण्याची असल्याने जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनाला आपचा पाठिंबा असल्याचे विवेक ताम्हणकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!