मालवणी भाषा ही खऱ्या अर्थाने “अमृतवाणी”

सावंतवाडीतील ‘मालवणी करंडक’चे विनायक राऊतांकडून कौतुक; नाट्यप्रेमींची मोठी गर्दी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आपली मालवणी भाषा ही अतिशय गोड आणि समृद्ध आहे. नाशिक, ठाणे, बदलापूर आणि अगदी दिल्लीत स्थायिक झालेले कोकणी माणूस मात्र आवर्जून मालवणी बोलताना दिसतो. ही भाषा केवळ बोलीभाषा नसून ती खऱ्या अर्थाने ‘अमृतवाणी’ आहे. हीच भाषेची श्रीमंती आणि गोडी पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मालवणी करंडक’सारखे उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे,” असे गौरवोद्गार माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी काढले.​

सावंतवाडी येथील ओंकार कला मंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मालवणी करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित राहून श्री. राऊत यांनी करंडकाच्या प्रतिकृतीचे अनावरण केले.

यावेळी श्री. राऊत पुढे म्हणाले की, आपल्याला सुचलेली कल्पना प्रत्यक्षात उतरवणे आणि त्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करणे ही साधी गोष्ट नाही. अमोल टेंबकर, रुजूल पाटणकर यांनी हे जे पाऊल उचलले आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे. कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे आणि भाषेची वृद्धी करणे यासाठी हे आयोजक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. “हे तुमचे पहिले पाऊल नसून पुढच्या अनेक वर्षांच्या प्रवासाची ही सुरुवात आहे. तुम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा विश्वासही त्यांनी यावेळी आयोजकांना दिला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे आभार मानताना त्यांनी सांगितले की, आपल्या भाषेच्या प्रेमापोटी तुम्ही इथे आलात, हेच या उपक्रमाचे यश आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर मालवणी करंडकचे स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, माजगाव जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, परीक्षक सतीश पाटणकर, मालवणी करंडकचे अध्यक्ष अमोल टेंबकर, उपाध्यक्ष तथा पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचे संचालक रुजूल पाटणकर, कश्मीरा पाटणकर, आर्या टेंबकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बाबुराव धुरी आणि रुपेश राऊळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अमोल टेंबकर, रुजूल पाटणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाला त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी शहरात अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने होत राहिले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच यापुढील काळातही अशा उपक्रमांसाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू, असा शब्दही त्यांनी आयोजकांना दिला.​ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालवणी करंडक महोत्सव समितीच्या माध्यमातून नाट्यकर्मी कै. आबा नेवगी यांच्या स्मरणार्थ चेतन नेवगी पुरस्कृत पुरस्कार, सचिन धोपेश्वरकर (सावंतवाडी), ज्येष्ठ रंगकर्मी दिनकर धारणकर यांच्या स्मरणार्थ हर्षवर्धन धारणकर यांच्याकडून पुरस्कृत सगुण पोळेकर (मालवण), नाटय प्रेमी शंकर बंडू बिद्रे यांच्या स्मरणार्थ महेश बिद्रे यांच्याकडून पुरस्कृत भाई सामंत (कणकवली) यांचा “कला गौरव” पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी नाट्यसिंधू, पुणे (चित्रकथी), रंगवलय, अंधेरी (बार बार), वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान, कणकवली (पडीक) व आघाझ द रायझिंग युथ (लपंडाव) आदी एकांकिका सादर करण्यात आली.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक तुषार साळगावकर, माही-मलिक, मालवणी हिरो गणेश कुंभार, कळसुलकरचे माजी शिक्षक संतोष वैद्य यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनानाथ वारंग यांनी केले तर आभार अमोल टेंबकर यांनी मानले. यावेळी सहसचिव सचिन मोरजकर, खजिनदार श्रेयस मुंज, सदस्य निरंजन सावंत, अनिकेत आसोलकर, आनंद काष्टे, निखिल माळकर, सावली पाटकर, हेमंत पांगम, साहिल सावंत, ओम टेंबकर, आराध्या मोरजकर, भालचंद्र लांबर, मृणाल पावसकर, प्रणव तारी, सिद्धेश नेरुरकर, प्रशांत सावंत, मृणाल चेंडके, हर्ष जाधव, अक्षय माशाळ, सर्वेश मोरजकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!