खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावाच्या म.गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी पुन्हा एकदा शेर्पे बौद्धवाडी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पांडुरंग कांबळे यांची बिनविरोध फेर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
शेर्पे ग्राम पंचायतीची सर्वसाधारण ग्राम सभा नुकतीच सरपंच स्मिता पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. या सभेमध्ये चंद्रकांत कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच सिराज मुजावर,ग्रा.पं. सदस्य चंद्रकांत शेलार,भूषण शेलार, शीतल कांबळे,राणी पांचाळ, ग्रामसेवक माने,तंटामुक्त समितीचे सचिव व गावचे पोलीस पाटील विनोद शेलार,माजी सरपंच धनराज शेलार, राबिया मनाजी,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विलास पांचाळ आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
चंद्रकांत कांबळे हे बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या धार्मिक संघटनेचे अध्यक्ष असून शेर्पे बौद्ध विकास मंडळाचे देखील ते सक्रिय कार्यकर्ते आहेत.तसेच म.रा.एस टी महामंडळ खारेपाटण एस टी बसस्थानकात वाहतूक नियंत्रक म्हणून काम करून सेवानिवृत्त झालेले आहेत.सन २०२३- २४ साली गावच्या तंटामुक्त समिती निवड झालेले श्री चंद्रकांत कांबळे यांची पुन्हा एकदा सन २०२४-२५ वर्षांकरिता गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी पुन्हा एकदा फेर निवड करण्यात आली आहे.
“संपूर्ण गावाने माझ्यावर विश्वास दाखवून पुन्हा एकदा दुसऱ्यांदा माझी शेर्पे गावच्या म. गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड केली.त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे व मला सहकार्य करणाऱ्या समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांचे मनापासून आभार मानतो. व मला जी जबाबदारी दिली ती निपक्षपाती पणे पार पडणार असून गावात कायदा सुव्यवस्था सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेर्पे गाव म.गांधी तंटामुक्ती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांनी यावेळी सांगितले.