राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत बापर्डे, परुळेबाजार, निरवडे ग्रामपंचायतींना यश

२३ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात पुरस्कार वितरण

ओरोस (प्रतिनिधी) : राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2018-19, 2019-20, 2020-21 व 2021-22 या कालावधीतील स्पर्धेत राज्यस्तरावर बापर्डे, परुळेबाजार, निरवडे या तीन ग्रामपंचायतीनी यश संपादन केले आहे. या तिन्ही ग्राम पंचायतीचा २३ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी दिली आहे.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2019-20 मध्ये देवगड तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायत, वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार याचे नामाकंण राज्यस्तर स्पर्धेकरीता झाले होते. तर 2020-21/2021-22 या स्पर्धेत ग्रामपंचायत परुळेबाजार व सावंतवाडी तालुक्यातील निरवडे ग्रामपंचायत यांना राज्यस्तर स्पर्धेकरीता नामांकन प्राप्त झाले होते. या तिन्ही ग्राम पंचायतीची राज्यस्तरीय समितीच्या माध्यमातुन तपासणी पुर्ण करण्यात आली होती. त्याचा निकाल राज्यस्तरावर निश्चित करण्यात आला आहे. पुरस्कारासाठी या तिन्ही ग्राम पंचायती पात्र ठरल्या आहेत. मात्र, राज्यात प्रथम, द्वितीय की तृतीय क्रमांक किंवा अन्य विशेष पुरस्कार या ग्राम पंचायतींना मिळणार आहे, याबाबत राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने स्पष्ट केलेले नाही.

हा पुरस्कार वितरण कार्यक्रम 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर, नवीन उस्मानपुरा, पन्नालाल नगर येथे आयोजित करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातील बापर्डे, परुळेबाजार, निरवडे ग्राम पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, संत गाडगेबाबा स्वच्छता समिती अध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे. उल्लेखनिय काम केल्याबद्दल त्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, विद्यमान जिल्हाधिकारी अनिल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विनायक ठाकुर, बापर्डे ग्रामसेवक शिवराज राठोड, परुळेबाजार ग्रामसेवक शरद शिंदे यांनाही या कार्यक्रमात अभियान प्रभावी नियोजन, अमंलबजावणी व अभियानात उल्लेखनिय काम केल्याबद्दल सन्मानीत करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!