96 लाख 32 हजारांच्या अपहारच्या गुन्ह्यात सोनार आहे न्यायालयीन कोठडीत
ओरोस (प्रतिनिधी) : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था शाखा कणकवली चा तत्कालीन शाखाधिकारी बाळकृष्ण बंडा सोनार ( रा. गंगापूर, भुदरगड, जि. कोल्हापूर ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला. याकामी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. बाळकृष्ण सोनार याने ठेवीदारांच्या ठेवी, कर्जदारांनी कर्जपोटी परतफेड केलेल्या एकूण 96 लाख 32 हजार 115 रुपयांचा अपहार करून स्वतःसाठी वापरले. 1 एप्रिल 2001 ते 12 फेब्रुवारी 2021 दरम्यान हा अपहार सोनार याने केला होता.याबाबत धनंजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 19 डिसेंबर 2022 रोजी बाळकृष्ण सोनार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी सोनार याला 23 जानेवारी 2024 रोजी अटक करण्यात आली असून सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.आरोपी बाळकृष्ण सोनार याने दाखल केलेल्या जामीन अर्जाला हरकत घेताना सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्द्यांवर युक्तिवाद केला.आरोपी ने यापूर्वीही असा अपहार केल्याचा गुन्हा न्यायप्रविष्ट असून त्याला अपहार करण्याची सवय आहे, शाखाधिकारी म्हणून आरोपी बाळकृष्ण याचा या गुन्ह्यात परिपूर्ण सहभाग आहे, अपहार केलेल्या रक्कमेतून आरोपीने कुठली स्थावर अथवा जंगम मालमता खरेदी केली याबाबत आरोपीने स्वतःच्या आजार पणाची सबब सांगून माहिती दिलेली नाही, खोट्या बनावट स्लिप तयार करून ठेवीदारांच्या बनावट सह्या आरोपीने केल्या आहेत, आरोपीला असा अपहार करण्याची सवय आहे, आरोपी परजिल्ह्यातील असून खटल्याच्या सुनावणी वेळी तो जामीन मिळाल्यास गैरहजर राहण्याची शक्यता आहे, वादग्रस्त हस्ताक्षर नमुने तपासणीसाठी हस्ताक्षर तज्ञ पुणे येथे पाठविण्यात आले असून अद्याप अहवाल बाकी आहे. सरकारी वकील रुपेश देसाई यांच्या युक्तिवादानंतर जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी आरोपी बाळकृष्ण सोनार याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.












