युवती छेडछाड गुन्ह्यातील आरोपी पोलीस कर्मचारी निलंबित

देवगड (प्रतिनिधी) : घरी परतणाऱ्या युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल असलेल्या सहा संशयितांपैकी शासकीय सेवेत असणाऱ्या तीन संशयितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या हरिराम मारुती गीते (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), प्रवीण विलास रानडे (३४, मधुबन सिटी, वसई (पू)) या संशयितांवर मिरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सुहास बावचे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. तर याच संशयितांमधील राज्य राखीव पोलीस बल गट ८ मुंबई गोरेगाव येथे पोलीस नाईक म्हणून कार्यरत असणाऱ्या सटवा केशव केंद्रे (३२, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड) या संशयितांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

देवगड शहरात पर्यटक म्हणून आलेल्या हरिनाम गीते, माधव सुगराव केंद्रे (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), सटवा केशव केंद्रे, श्याम बालाजी गीते (३५, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), शंकर संभाजी गीते (३३, रा. बदलापूर (पू), जि. ठाणे), प्रवीण विलास रानडे या संशयितांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने देवगड बाजारपेठ मार्गावरील आनंदवाडी नाका येथे एका युवतीची छेड व विनयभंग करून तिचा पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास घडली होती. पीडित युवतीच्या फिर्यादीनंतर सर्व संशयित आरोपींवर देवगड पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४, ७५ (२), १४० (१), १४० (३), १४० (४), ६२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याखाली देवगड न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, यातील संशयित हे शासनाच्या विविध खात्यात कार्यरत आहेत. यातील संशयित हरिनाम गीते व प्रवीण रानडे हा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. संशयित माधव केंद्रे हा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) विभागात कार्यरत आहे. संशयित सटवा केंद्रे हा राज्य राखीव पोलीस बल गट ८ मुंबई गोरेगाव येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे. श्याम गीते हा नांदेड एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहे. संशयित शंकर गीते हा बृहन्मुंबई महानगरपालिकेतंर्गत भायखळा मुंबई येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!