युवतीची छेड काढल्याप्रकरणी पोलीस अटकेत असणाऱ्या ६ संशयितांना न्यायालयासमोर हजर केले

देवगड न्यायालयाने सर्व संशयितांना ११ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली

देवगड (प्रतिनिधी) : युवतीची छेड काढल्याप्रकरणी पोलीस अटकेत असणाऱ्या हरिराम मारुती गीते (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड) याच्यासह सहा संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सर्व संशयितांना शनिवारी दुपारी देवगड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मात्र, तत्पूर्वी देवगड ग्रामस्थांनी पोलीस स्थानकाबाहेर आक्रमक भूमिका घेत सर्व संशयितांना न्यायालयात पायी चालत घेऊन जाण्याची विनंती देवगड पोलिसांकडे केले. संशयित नराधमांचे चेहरे सर्व जनतेसमोर आले पाहिजेत. त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, पोलिसांनी कायदा व सुरक्षिततेच्यादृष्टीने ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन करून सर्व संशयितांना चोख पोलीस बंदोबस्तात देवगड न्यायालयासमोर हजर केले. देवगड न्यायालयाने सर्व संशयितांना ११ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून संशयितांची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली आहे. देवगड शहरात पर्यटक म्हणून आलेले संशयित हरिराम मारुती गीते (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), माधव सुगराव केंद्रे (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), सटवा केशव केंद्रे (३२, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), श्याम बालाजी गीते (३५, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), शंकर संभाजी गीते (३३, रा. बदलापूर (पू), जि. ठाणे), प्रवीण विलास रानडे (३४, मधुबन सिटी, वसई (पू)) या संशयितांनी देवगड बाजारपेठकडे जाणाऱ्या आनंदवाडी नाका येथे युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व संशयितांची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास घडली होती. पोलिसांनी पीडित युवतीच्या तक्रारीनुसार सर्व संशयितांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायायलाने सर्व संशयितांना २८ सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी सकाळी देवगड पोलीस सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यासाठी नेत होते. मात्र, याचवेळी देवगड पोलीस स्थानकाबाहेर जमलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सर्व संशयितांना पायी चालत न्यायालयापर्यंत न्यावे. जेणेकरून सर्व जनतेला संशयित नराधमांचे चेहरे दिसले पाहिजेत. या घटनेतील अन्य एक संशयित असण्याची शक्यता असून त्याने संशयितांची गाडी पळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर अद्याप का गुन्हा दाखल केला नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासमोर उपस्थित केला.

पोलीस निरीक्षक देवकर यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. कायदा व सुरक्षिततेच्यादृष्टीने संशयितांना न्यायालयापर्यंत पायी चालत नेणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली भूमिका मागे घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक देवकर यांनी ग्रामस्थांना केले. यावेळी संशयितांना न्यायालयात नेण्यासाठीचे पोलीस वाहन पोलीस स्थानकाच्या मुख्य गेटपासून २० फूटाच्या अंतरावर उभे करून ठेवण्यात आले. यावर सर्व संशयितांना उपस्थित ग्रामस्थांसमोर पोलीस वाहनापर्यंत तरी चालत घेऊन जावे, अशी मागणी केली. यावर पोलीस निरीक्षक देवकर यांनी सर्व संशयितांना वाहनाकडे नेण्यापूर्वी ग्रामस्थांनी काही अंतरावर उभे राहावे, अशी विनंती केली. मात्र, ग्रामस्थांनी आमच्यासमोर संशयितांना पोलीस वाहनात बसवावे, अशी मागणी केली. मात्र, देवगड पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांची ही मागणीही धुडकावून लावल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. ज्या संशयित नराधमांची तुम्ही एवढी काळजी घेत आहात, त्या नराधमांनी एका युवतीचा विनयभंग करून येथील पोलीस स्थानकातही धिंगाना घातला आहे. या नराधमांना तुम्ही पाठीशी घालू नका. ग्रामस्थांनी देवगड पोलिसांना आजपर्यंत सहकार्याची भूमिका ठेवली आहे. पुन्हा अशी घटना घडल्यास संशयितांना पोलीस स्थानकात न आणता त्याचा न्याय देवगड ग्रामस्थ करतील, असा सज्जड इशारा ग्रामस्थांनी पोलिसांना दिला. तर पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही मूलबाळ असून असा प्रसंग आपल्याबाबत घडला तर संशयितांबाबत आपली भूमिकाही अशीच मवाळ राहणार का? असा रोखठोक सवाल ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला विचारला. ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत पोलीस निरीक्षक देवकर यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यानंतर ग्रामस्थ काही अंतर मागे हटले. तेथे पोलिसांनी मानवी कडे निर्माण करून पोलीस वाहन गेटपर्यंत आणत संशयित आरोपींना पोलीस वाहनात बसविले. मात्र, यावेळी सर्व संशयितांच्या चेहऱ्यावर बुरखा घालण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी ‘संशयितांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे’, ‘पीडित युवतीला न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा दिल्या.

यावेळी बंटी कदम, पप्पू कदम, निशिकांत साटम, हर्षा ठाकुर, शामल जोशी, सुधीर मांजरेकर, राजू पाटील, बलवान, गुरुदेव परुळेकर, विशाल कोयंडे, किसन सूर्यवंशी, नाना कांदळगावकर, पोलीस पाटील आंचल कांदळगावकर, नलावडे, विलास रुमडे, राजू जोशी, निनाद देशपांडे, अभय बापट, संतोष तारी, विशाल मांजरेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!