वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले २५ दिवस बंद असलेली भुईबावडा घाटातील एस. टी बस वाहतूक रविवारी २० ऑक्टोबर पासून सुरु करण्याचे आदेश विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील सात आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. मात्र सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेतच ताशी २० ते २५ किमी वेगाची मर्यादा घालण्यात आली आहे.
भुईबावडा घाट परिसरात २६ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीमुळे घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळून त्याचप्रमाणे मोरी वाहून गेल्याने हा घाट मार्ग बंद होता. तर करूळ घाटाचे नूतनीकरण सुरू असल्याने हा घाट ही गेले नऊ महिने बंद आहे. दोन्ही घाट बंद असल्याने वैभववाडीसह जिल्ह्यातील प्रवासी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. तर या दरम्यान बऱ्याच एसटी बसेस फोंडाघाट मार्गे वळविल्याने तर काही गाड्या रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे ही प्रचंड नुकसान झाले आहे.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घाटातील दरडी हटवून घाटातील संरक्षक भिंत व मोरीचे बांधकाम करून, बांधकाम विभागाने काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत असल्याचे पत्र एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांना दिनांक ११ ऑक्टोबर रोजी देण्यात आले होते.
मात्र एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना घाट रस्त्याची पाहणी करून घाट रस्ता सुरळीत असल्याची पाहणी करण्यासाठी तब्बल आठ दिवस लागले. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून सावंतवाडी कुडाळ मालवण वेंगुर्ला देवगड कणकवली विजयदुर्ग या आगार व्यवस्थापकांना भुईबावडा घाट रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत असल्याचे कळविले आहे. मात्र एस टी बस वाहतूकीला वेग मर्यादा घालून फक्त दिवसा घाटातून एस. टी बस सोडण्यात येणार आहेत. तर सायंकाळी सहा ते सकाळी सहा दरम्यान रात्रीच्यावेळी ही वाहतूक फोंडा घाटातून राधानगरी मार्गे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे काहीसा प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.











