उद्धव ठाकरेंची तोफ सिंधुदुर्गात कडाडणार

13 नोव्हेंबर रोजी कणकवली कुडाळ सावंतवाडी मध्ये जाहीर सभा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ सिंधुदुर्गात कडाडणार असून 13 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात विधानसभा प्रचाराची तोफ महायुतीवर डागणार आहेत. सिंधुदुर्गातील तीनही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडून कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठाचे संदेश पारकर, कुडाळ मतदारसंघातून शिवसेना उबाठा चे वैभव नाईक, सावंतवाडी मतदारसंघात शिवसेना उबाठा चे राजन तेली रिंगणात आहेत. सिंधुदुर्गात खऱ्या अर्थाने राणे विरुद्ध ठाकरे असाच सामना पहायला मिळणार आहे. खासदार नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र शिवसेना उबाठा च्या उमेदवारांविरोधात विधानसभा निवडणूक लढवत आहेत. कणकवलीत संदेश पारकर विरुद्ध नितेश राणे तर कुडाळ मध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे अशी प्रमुख लढत असणार आहे. सावंतवाडीत महायुतीच्या शिंदे शिवसेनेकडून दीपक केसरकर विरुद्ध राजन तेली , अपक्ष अर्चनाताई घारेपरब, विशाल परब अशी चौरंगी प्रमुख लढत होणार आहे.त्यामुळे 13 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे काय बोलणार ? विरोधकांना कसे चिमटे काढणार ? राणेंना कोणत्या शब्दांनी डीवचणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!