वर्दे गाव आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा
कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील वर्दे गावातील २ अपक्ष ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच यांचा खासदार नारायण राणे व निलेश राणे यांनी शिंदे गटात प्रवेश करून घेतला आणि ते सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संबंधित आहेत असे भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र या सदस्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी काडीमात्र संबंध नाही असे सांगत वर्दे सरपंच पप्पू पालव यांनी राणेंचा हा दावा खोडून काढला आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले, वर्दे गावातील मी स्वतः सरपंच व आमचे ५ ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व मतदार हे आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्दे गावातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आमदार वैभव नाईक यांचे एकमताने एक दिलाने काम करत आहेत. त्यामुळे पराभवाची चाहूल लागल्याने निलेश राणे दिशाभूल करून खोटे पक्ष प्रवेश घेत आहेत अशी टीका पप्पू पालव यांनी केली आहे. निलेश राणे यांच्याकडून आमिष दाखवून मतदार फोडण्याचाही प्रयत्न सुरू आहे. परंतु ते यात यशस्वी होणार नाहीत आमदार वैभव नाईक यांचा विजय हा मोठ्या मताधिक्याचा आणि लक्षवेधी असेल असा विश्वास वर्दे सरपंच पप्पू पालव यांनी केला आहे.