निवडणुकीच्या धामधुमीत, बांधकाम विभागाचे रस्त्यावरील खड्ड्याकडे अक्षम्य दुर्लक्ष !

इतर घाट मार्ग अंशतः सुरू असल्याने, फोंडाघाट रस्त्यावर ट्राफिक जाम ,? सर्व यंत्रणा सुशेगात

शासनाच्या हलगर्जीपणामुळे मतदार- ग्रामस्थ- वाहन चालक संतप्त !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : पाऊस थांबल्यास आठ दिवस उलटून देखील, सिंधुदुर्ग बांधकाम- रस्ते विभाग अजूनही झोपेतून जागा झाला नसल्याने, घाट मार्गापासून करुळ (कणकवली) आणि विशेषतः फोंडाघाट बाजारपेठेतील रस्त्याची मोठाल्या खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. त्यामुळे हाच का तो गेल्यावर्षी हॉट- मिक्स द्वारे केलेला राज्यमार्ग का ? असा संतप्त सवाल वाहन चालक, व्यापारी, ग्रामस्थ आणि गोरगरीब जनतेमधून उपस्थित होत आहे. शासनाच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या डोळेझाकपणामुळे याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

खिंडीपासून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडून, आतील खडी डोकावू लागली आहे. फोंडा ग्रामपंचायत, मारुतीवाडी, बाजारपेठ, राधाकृष्ण मंदिर, एसटी स्टँड समोर, पासून पाच झाडे ते करुल पर्यंत तर खड्ड्यांची मालिकाच आहे. गाडी कशी चालवायची ? आणि कोणता खड्डा चुकवायचा ? या द्विधा मनस्थितीत,आजवर अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. कोणाचा बळी जाण्यापूर्वी, तातडीने संबंधित बांधकाम विभागाने पाऊस थांबला असल्यामुळे, चिरे दगड न वापरता, खडी-०डांबर वापरूनच सर्व खड्डे रोलिंगने तातडीने बुजवावेत. मूलभूत सुविधा देण्यासाठी आचारसंहिता आणि निवडणुकीचा बाऊ न करता, बांधकाम विभागाच्या सदैव दक्ष अभियंत्यांनी कारण देऊ नये. अशी आग्रही मागणी व्यापारी व वाहन चालकांनी केली आहे.

वैभववाडी- आंबोली- गगनबावडा घाटातील वाहतूक सुरळीत चारचाकी, दुचाकी साठी दिवसाची अंशतः तर जडवाहनांसाठी वाहतूक दिवस-रात्र बंद असल्याने, सर्व वाहतूक फोंडा – घाट मार्गे गेल्या वर्षभर चालू आहे. सध्या निवडणुकीमुळे चेकपोस्टवर चेकिंग तसेच फोंडा बाजारपेठेत सर्वच वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याने तासंतास वाहतूक खोळंबा असतो. पोलीस निवडणूक यंत्रणेत व्यग्र असल्याने व इतर सर्व यंत्रणा सुषेगात आहेत. मात्र याचा त्रास सर्वसामान्य गोरगरीब ग्राहकांना व्यापाऱ्यांना आणि वाहन चालकांना बाजारपेठेत भोगावा लागतो.त्यातही खड्ड्यांचा आणि धुरामुळे प्रदूषणाचा त्रास, आरोग्याला हानिकारक होत आहे. त्यामुळे सर्दी खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तातडीने वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी परिसरातून व्यक्त होत आहे..

error: Content is protected !!