प्रकल्पाची जागाच निश्चित नसल्याचे अधिवेशनात स्पष्टीकरण
मुणगेत अणुऊर्जा प्रकल्प येण्याची केवळ गावगप्पा
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्य सरकारने सामंजस्य करार केलेला एन. टी. पी. सी अणुऊर्जा प्रकल्प देवगड मध्ये येणार असे जाहीर झाले होते. मात्र याच अनुषंगाने पावसाळी अधिवेशनात विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवगड सह कोकणात प्रस्तावित असलेल्या कुठल्याही अणुऊर्जा प्रकल्पाची अंतिम जागा निश्चित केली नसल्याचे सांगितले. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच अणुऊर्जा प्रकल्पाबाबत जागाच निश्चित केली नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे देवगड तालुक्यातील मुणगे येथे अणुऊर्जा प्रकल्प येणार ही केवळ गावगप्पच ठरली आहे. 25 मे 2026 रोजी महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सामंजस्य करार केला. पूर्णगड, मेर्वी, बारसू तसेच देवगड येथे हे अणुऊर्जा प्रकल्प येणार अशी चर्चा मागील महिनाभर सुरू आहे. मात्र या चर्चेला कुठलाही प्रशासकीय आधार नव्हता. प्रशासनाच्या किंवा शासनाच्या वतीने देवगड तालुक्यात प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाची जागा निश्चित करण्यात आली नव्हती. अथवा जागा निश्चितीबाबत कुठलेही अधिकृत स्टेटमेंट देण्यात आले नव्हते. या चर्चेच्या अनुषंगाने देवगड तालुक्यातील मुणगे येथे प्रस्तावित असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पामुळे हापूस आंबा, काजू, मासेमारी धोक्यात येण्याच्या भीतीने विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे शिवसेनेने रान उठवायला सुरुवात केली होती. तसेच स्थानिक नागरिकही प्रकल्पविरोधी भूमिकेत होते. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात आमदार ज्योती गायकवाड, आमदार अमीन पटेल, आमदार संजय मेश्राम, आमदार अस्लम शेख आदींनी कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाची जागा निश्चित केली आहे काय असा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अद्याप अणुऊर्जा प्रकल्पाची जागा निश्चित केली नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुणगे येथे अणुऊर्जा प्रकल्प होणार ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.










