बोडस चॅरिटेबल ट्रस्ट करणार कोकण रेल्वेच्या

एकूण १७ महिला स्टेशन मास्तरांचा सन्मान

कोरेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या अशासकीय संस्थेमार्फत सत्कार होणार

आचरा (प्रतिनिधी) : बोडस चॅरिटेबल ट्रस्ट गेली १४ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०३ व्यक्ती आणि ५ संस्था यांना विविध पुरस्कार दिले आहेत. या वर्षी सन २०२६ साली बोडस चॅरिटेबल ट्रस्टने आपल्या वर्धापनदिनी कोकण रेल्वेच्या १७ महिला स्टेशन मास्तरांना विशेष कार्यसन्मान पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. महिला सक्षमीकरण उपक्रम म्हणून हा सन्मान केला जाणार आहे. सेवा काळात सदर महिला स्टेशनमास्तर यांनी दाखवलेले प्रसंगावधान, चाकोरीबाहेर जाऊन केलेले प्रवाशांचे संरक्षण, चुकलेल्यांची घरच्यांशी घडवलेली पुनर्भेट, रोखलेल्या संभाव्य आत्महत्या आणि कसोटीच्या वेळी दाखवलेले धैर्य न तत्परता याबद्दल कृतज्ञता म्हणून हे पुरस्कार आहेत. बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्षेत्रातील दिवाणखावटी ते मडूरे या २६ स्थानकांपैकी १७ स्थानकांवर कार्यरत महिला स्टेशन मास्तरांना व्यक्तिगत सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक देण्यात येणार आहे. या सन्मानासाठी ३१ मे २०२६ अखेर कार्यरत महिला स्टेशन मास्तर हा एकाच निकष लावण्यात आला आहे. एकूण ७ महिला स्टेशन मास्तर रत्नागिरी जिल्ह्यात आहेत तर १० जणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. कोकण रेल्वेच्या सेवा नियमांचे पालन करून सदर गौरवमूर्तीना कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक लाभ देण्यात येणार नाही. या उपक्रमासाठी कोकण रेल्वेचे रत्नागिरीचे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट आणि जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी विशेष सहाय्य केले आहे.

सदर १७ महिला स्टेशन मास्तरांचा व्यक्तिगत सेवाकालावधी हा ४ वर्षे ते ३० वर्षे असा व्यापक आहे. प्रतीक्षा लक्ष्मण गावकर (मडूरे स्टेशन) या सर्वात सेवाजेष्ठ आहेत तर कु. चैताली राजेंद्र कल्याणकर (रत्नागिरी स्टेशन) या सर्वात तरुण आहेत. एकूण १५ महिला स्टेशन मास्तर मुळच्या कोकणातील रहिवासी आहेत. या पैकी अनुराधा रितेश पवार या सावंतवाडी स्थानकावरून जून २०२६ मध्ये २२ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या आहेत. एकूण ९ महिला स्टेशन मास्तर या प्रकल्पासाठी जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्त गटातील, २ जणी अनुकंपा तत्वावर लागून पदोन्नती झालेल्या आणि उर्वरित ६ ह्या थेट स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवेत रुजू झालेल्या आहे. या पैकी ३ जणींचे पतीसुद्धा कोंकण रेल्वेत कामाला आहेत. विशेष बाब म्हणजे अनघा राजाराम नाटेकर यांनी १९९५ मध्ये रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी रोजंदारीवर काम केले होते. गौरवमूर्ती १७ महिला स्टेशन मास्तरांपैकी ५ जणींना विविध वर्षी कोकण रेल्वेच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २ जणींना रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे रुपये १००० चे विशेष रोख पारितोषिक मिळाले आहे. २ जणींना रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक यांचे विशेष प्रमाणपत्र आणि रुपये १,००० चे बक्षीस मिळाले आहे. तर कु. चैताली राजेंद्र कल्याणकर ह्या आपल्या कार्यमूल्यमापनात प्रथम आल्या मुळे केआरए पुरस्कार प्राप्त आहेत. मनिषा हरिश्चंद्र तटकरी यांना दोन वेगवेगळ्या वर्षी दोन वेगवेगळ्या स्थानकांवर दोन वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत.

बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यसन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या १७ महिला स्टेशन मास्तर पुढीलप्रमाणे:- (०१) मनिषा हरिश्चंद्र तटकरी कळंबणी बुद्रुक स्टेशन (०२) कु. अस्मिता तुकाराम सावंत खेड स्टेशन (०३) श्रद्धा समिर चिले-खेड स्टेशन (४) शिल्पा शंकर दपके चिपळूण स्टेशन (०५) निकिता निलेश पवार- कडवाई स्टेशन (०६) अनघा राजाराम नाटेकर, रत्नागिरी स्टेशन (०७) कु. चैताली राजेंद्र कल्याणकर – रत्नागिरी स्टेशन (०८) कु. प्राजक्ता प्रदीप कांबळे-खारेपाटण स्टेशन (०९) कु. अंजली श्रीराम चाळके- नांदगाव स्टेशन (१०) मनस्वी सुभाष कदम नांदगाव स्टेशन (११) विशालम दिनेश बेटकर -कणकवली स्टेशन (१२) रंजना दीपक माने- कणकवली स्टेशन (१३) सुविधा इमानवेल स्वामी-सिंधुदुर्ग स्टेशन (१४) मेघा कमलाकर नागवेकर- सिंधुदुर्ग स्टेशन (१५) प्रज्ञा भालचंद्र नाईक झाराप स्टेशन (१६) अनुराधा रितेश पवार- सावंतवाडी स्टेशन (१७) प्रतीक्षा लक्ष्मण गावकर मडूरे स्टेशन जुलै महिन्यात पहिल्या १० दिवसात एकूण १२ महिला स्टेशन मास्तरांचा सन्मान त्यांच्या सेवेच्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर उर्वरित ५ महिला स्टेशन मास्तरांचे सन्मान साहित्य त्याच्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठविले जाईल असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲडव्होकेट आदिती अभिजित पटवर्धन यांनी कळवले आहे.

error: Content is protected !!