इमारतीचे मोठे नुकसान
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा रुग्णालयाच्या निवासी संकुलला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याने सर्वांची धांदल उडाली. भर दुपारी आग लागल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना दोन अग्निशमन बंब आणि सुरक्षा यंत्रणा, कर्मचारी यांची चांगलीच दमछाक झाली. सुदैवाने येथे वास्तव्याला कोणी नव्हते. परंतु या आगीत इमारतीचे मोठे नुकसान झाले असून आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. मात्र, यात रुग्णांसाठी आणलेल्या गाद्या आणि कोरोनासाठी खरेदी केलेले पी पी ई कीट जळून मोठे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कुडाळ आणि मालवण नगर पंचायतचे अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले होते. तसेच सुरक्षा रक्षक, पोलीस व होमगार्ड यांनी अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, जिल्हा रुग्णालयात आपत्ती ओढवली असताना हाकेच्या अंतरावर असलेला जिल्हा आपत्ती कक्ष मात्र दिसला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.