चौके (प्रतिनिधी) : “आरोग्य चांगले राहायचे असेल तर जीवनात खेळ महत्वाचे आहेत, चांगल्या आरोग्यासाठी लहानपणा पासूनच खेळाची सवय अंगी बाणवली पाहिजे. खेळातून आरोग्य घडते ते कुठे विकत मिळत नाही त्यासाठी खेळणे महत्वाचे आहे.” असे प्रतिपादन मालवण पंचायत समितीचे माजी सभापती तथा क्रीडाशिक्षक सन्मा. श्री. राजेंद्र परब सर यांनी आंबेरी केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी काळसे येथे बोलताना केले.
आंबेरी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ काळसे हायस्कूलच्या क्रिडांगणावर गुरुवारी सकाळी श्री. राजेंद्र परब यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून करण्यात आला. यावेळी आंबेरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. नंदकिशोर गोसावी यांनी प्रास्ताविकात बोलताना उपस्थितांना जिल्हा परिषद मार्फत खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा इतिहास सांगितला.
यावेळी केंद्र मुख्याध्यापक श्री. धानजी चव्हाण, आंबेरी केंद्रातील विविध शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, पालक व ग्रामस्थ यांचेसह आंबेरी केंद्रातील सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. या केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये आंबेरी केंद्रातील ११ प्राथमिक शाळांतील सुमारे १०० मुलांमुलींनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील विजेते, उपविजेते स्पर्धक व संघ यांना देण्यात येणारी प्रमाणपत्रे, मेडल व ट्रॉफी केंद्रातील शिक्षक दाम्पत्य श्री/सौ.मिलन सिद्धार्थ नेरुरकर यांचेकडून व खेळात सहभागी सर्व स्पर्धकांना भेटवस्तू आंबेरी नं. 1 शाळेच्या उपशिक्षिका श्रीम. रश्मी काळसेकर यांनी दिल्या. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन व पूर्व तयारी श्री. कृष्णा कालकुंद्रीकर व सहकारी यांनी केली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी सर, श्री. राजेंद्र परब सर, आंबेरी केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धामापूर बौद्धवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दीपक गोसावी व आभार प्रदर्शन आंबेरी मळा शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत कदम यांनी केले.












