भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केली भावना
ओरोस (प्रतिनिधी) : नितेश राणे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकणातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य आणि उत्साह पाहायला मिळाला, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा नागपूर येथे संपन्न झाला. या सोहळ्याला उपस्थित होतो. कणकवली विधानसभेचे तिसऱ्या टर्मचे आमदार आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेने परिचित असलेले भारतीय जनता पार्टीचे युवा नेते नितेश राणे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून या राज्य मंत्रिमंडळात समावेश होताना बघून मनस्वी आनंद झाला. नितेश राणे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकणातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य आणि उत्साह पाहायला मिळाला.
गेल्या सरकारमध्ये आमचे रविंद्र चव्हाण यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात फार मोठे काम उभे केलेले आहे. त्याचबरोबर कोकणातील भाजपा संघटनेकडे विशेष लक्ष देवून सर्व निवडणुकात विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावलेली होती. त्यांचाच वारसा नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू राहील आणि नारायण राणे आणि रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपाचे मिशन पूर्णत्वास जाईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.
नितेश राणे यांनी दहा वर्षे कणकवली विधानसभेचे प्रतिनिधित्व करतानाच राज्यभर हिंदुत्व विषयातील कामाकडे विशेष लक्ष दिले. खरंतर ते हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. अशाच वेगाने त्यांचा संघटना आणि जिल्ह्याचा विकास या मार्गाने प्रवास सुरू राहील आणि ते राज्यातील एक प्रमुख नेते म्हणून कीर्ती मिळवतील, अशा शुभेच्छाही यावेळी प्रभाकर सावंत यांनी दिल्या.
यावेळी रविंद्र चव्हाण हे संघटना शरण कार्यकर्ते आहेत, आजपर्यंत पक्ष जो आदेश देईल तो शिरसावंद्य मानून त्यांनी काम केले. पक्षाने त्या त्या वेळी सोपवलेली जबाबदारी यशस्वी पणे पार पाडलेली आहे. कोकणातील संघटनेला जीवदान देवून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी उतुंग असे यश पक्षाला मिळवून दिलेले आहे. आता पक्षाने त्यांच्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देणे निश्चित केलेले आहे. त्या जबाबदारीला सुद्धा ते एका वेगळ्या उंचीवर नेतील आणि राज्यातील शत प्रतीशत भाजपचे स्वप्न साकार करतील असा आशावाद प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष या नात्याने नारायण राणे, रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ना नितेश राणे यांच्या साथीने जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत फार मोठे यश मिळवून विजयाची परंपरा अशीच अखंडित ठेवण्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांसमावेत अहोरात्र मेहनत करून जिल्ह्याला मिळालेले हे मंत्रिपद सत्कारणी लावू अशी भावना प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केली आहे.