कणकवली (प्रतिनिधी) : स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीच्या माध्यमातून व स्वयंसिद्धा कोल्हापूर यांच्या सहकार्यातून गोपुरी आश्रम या ठिकाणी दुग्ध प्रकिया कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन गोपुरी आश्रमचे सचिव विनायक मेस्त्री यांनी केले. त्यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणांमध्ये महिला बचत गटांना आपण उत्पादित करीत असलेल्या मालाला गोपुरी आश्रम मध्ये आठवडा बाजार संकल्पना राबवून विक्री करिता जागा उपलब्ध करून देण्यात येईल व त्यात जास्तीत जास्त महिलांनी व बचत गटांनी भाग घ्यावा असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संदीप सावंत यांनी स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच स्वयंदीप तनुज गोधडी हा उदयोग चालू आहे त्यामध्ये अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाल्या असल्याचे सांगितले स्वयंदीप चा मुख्य उद्देश हा आहे कि जास्तीत जास्त महिला उद्योजीका निर्माण व्हाव्यात. जास्तीत जास्त महिलांनी स्वयं रोजगारातून आर्थिक उन्नती साधावी यासाठी महिलांना आवश्यक असणारे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येईल व त्याचा महिलांनी लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
या प्रशिक्षणाला कणकवली व आजूबाजूच्या गावातील महिला उपस्थित होत्या त्यावेळी महिलांना स्वयंसिद्धा कोल्हापूर येथील प्रशिक्षिका राजश्री सावंत व मिताली निंबाळकर यांनी दुग्ध पदार्थ प्रात्यक्षिकासह पनीर, चीज, मलाई पेढे, बर्फी, दूध कोल्ड्रिंक, बासुंदी, कंदी पेढे, लस्सी, ,दही, रबडी, गुलाबजाम व रसगुल्ले इत्यादी पदार्थ करून दाखविले व पदार्थ करताना घ्यावयाच्या छोट्या छोट्या टिप्स त्यांनी महिलांना दिल्या. महिलांनी प्रत्यक्षपणे सर्व पदार्थ करण्यात आपला सहभाग दर्शविला.
या प्रसंगी प्रशिक्षणार्थी ॲड. श्रेया परुळेकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की अशा प्रकारचे पौष्टिक असे दुग्धजन्य पदार्थ आपण घरच्या घरी बनवून आपल्या मुलांना खायला देऊ शकतो. तसेच अशा प्रकारची प्रशिक्षण घेऊन भविष्यात महिला उद्योजिका तयार होतील असा मानस त्यांनी बोलून दाखवलं. पाहुण्यांचे स्वागत व आभार स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप सावंत यांनी केले त्यावेळी अॕड. मनीषा सावंत, विनायक सापळे व सदाशिव राणे उपस्थित होते.












