“राष्ट्रप्रेमाची भावना विद्यार्थ्यांना मध्ये जागृत व्हायला हवी…” – प्रा.डॉ.महेश खरात
खारेपाटण (प्रतिनिधी) : “सद्याचा काळ हा विद्यार्थी आणि शिक्षकांच्या दृष्टीने भयावह काळ असून आभासी दुनियेत विद्यार्थी भरकटला जात आहे. अशावेळी गुरुवर्य पेंढारकर यांचे पुण्यस्मरण करून शाळेच्या विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हायला हवी…” असे भावपूर्ण उदगार महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक कवी समीक्षक प्रा.डॉ.महेश खरात यांनी खारेपाटण शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांच्या १५ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात बोलताना काढले. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन शेठ न.म.विद्यालय खारेपाटण, ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स खारेपाटण तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने खारेपाटण हायस्कूल येथे करण्यात आले होते. प्रारंभी खारेपाटण हायस्कूल येथील प्रांगणात असलेल्या गुरुवर्य पेंढारकर यांच्या अर्ध पुतळ्याला मान्यवरांच्या उपस्थित पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुंबई येथील माजी विद्यार्थी रामदास वारीसे, गीता राऊत, खारेपाटण संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे सचिव – महेश कोळसुलकर, संचालक संदेश धुमाळे, राजेंद्र वरुणकर, दादा कर्ले, मोहन कावळे, विजय देसाई, प्रशांत गुळेकर, दिगंबर राऊत, गुरुप्रसाद शिंदे, योगेश गोडवे, संस्थेचे संचालक व सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे, खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप, डॉ. शंकर राणे,सामजिक कार्यकर्ते अमोल तळगावकर,संतोष पाटणकर, संकेत शेट्ये, सुभाष पाटील, स्मिता धुमाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी रामदास वारिसे व प्रसिद्ध साहित्यिक कादंबरीकार प्रा.डॉ.महेश खरात यांच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकर राव पेंढारकर यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.महेश खरात म्हणाले “साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले तर कोकणात खारेपाटण सारख्या पवित्र भूमीत स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकर राव पेंढारकर हे उतुंग व्यक्तिमत्व होऊन गेले. ज्यांनी भविष्याचा वेध घेत येतील जनतेला शिक्षणाची कवाडे खोलून दिली. त्यांची समाजसेवा व तळागाळातील शेवटच्या विद्यार्थ्यांला देखील शिक्षण मिळायला पाहिजे ही असलेली त्यांची भावना व तळमळ त्यांच्या आत्मचरित्रातून होत असली. तरी देखील प्राध्यापकांनी त्यांच्यवर प्रबंध लिहून विद्यापीठाकडे पाठवल्यास अभ्यासक्रमात त्याचा समावेश होईल व पेंढारकर सर जनमानसात खऱ्या अर्थाने जिवंत राहतील.”
यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी गीता राऊत, रश्मी मसुरकर, डॉ.बाळा राणे, रामदास वारीसे, प्रकाश चव्हाण, नंकिशोर कोरगावकर, योगेश गोडवे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त करत पेंढारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले ही शिक्षण संस्था आता ७५ वर्षाकडे वाटचाल करत असून या खडतर प्रवासात गुरुवर्य पेंढारकर यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. एका स्वातंत्र्य सैनिकाच्या सहवासाने पूनित झालेल्या या भूमीत त्यांचा समाजसेवा व शिक्षणाचा वारसा चालविण्याची संधी आम्हाला मिळत आहे. हे आम्ही आमचे भाग्य समजतो.
यावेळी संस्थेच्या वतीने शाळेचे मुख्यद्यापक संजय सानप यांचा शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तर संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांचा शाळेच्या सर्व विभागाच्या शिक्षकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध वृत निवेदक निलेश पवार यांनी केले. तर प्रस्ताविक हायस्कूलचे मुख्याद्यापक संजय सानप यांनी केले व प्रमुख पाहूण्याची ओळख कॉलेज चे शिक्षक नितीन वरुणकर यांनी करून दिली. शेवटी सर्वांचे आभार शाळेच्या शिक्षिका अमृते मॅडम यांनी मानले.















