“जगणं सुंदर झालं पाहिजे यासाठी काम करा ” – नितीन चंदनशिवे
खारेपाटण (प्रतिनिधी) : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात जगत असताना आपला जगणं आहे त्यापेक्षा अधिक सुंदर कसे होईल याकरिता काम केले पाहिजे.” असे भावपूर्ण उदगार “दंगलकार ” फेम प्रसिद्ध कवी व्याख्याते नितीन चंदनशिवे यांनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण च्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काढले.
शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनिअर कॉलेज खारेपाटण आणि कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण यांचा संयुक्त शालेय विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष प्रविन लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच दि.२६ डिसेंबर २०२४ ते ३० डिसेंबर २०२४ यादरम्यान सलग पाच दिवस खारेपाटण हायस्कूलच्या मैदानावर पार पडला.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे व जेष्ठ कवी दादा मडकईकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. दुपार सत्रात महेंद्र गव्हाणकर यांचा हिप्नॉटिझम चा कार्यक्रम पार पडला. सायं. ७ते १० या वेळेत प्राथमिक विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. तर दि.२७डिसेंबर २०२४ रोजी माध्यमिक विभागाच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या दिवशी सकाळ सत्रात ज्येष्ठ कवी, कथाकथनकार श्री.मारुती यादव यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला. दुपार सत्रात समीर चराटकर यांचा पैठणीचा खेळ हा कार्यक्रम महिला पालक वर्ग यांच्या सहभागाने उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. सायंकाळच्या सत्रात माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करीत रसिकांची दाद मिळवली.
दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी उच्च माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, दंगलकार नितीन चंदनशिवे तसेच निवृत्त पोलीस अधिकारी कांतीलाल कोथिंबीरे, प्रसिद्ध उद्योगपती व नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगीवेचे अध्यक्ष मनोज गुळेकर यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी ठरली.
यावेळी बोलताना दांगलकार कवी नितीन चंदनशिवे म्हणाले.”उंची किती आहे यावर माणूस ठरत नसून तो जगाला कसा यावर त्या माणसाची उंची अवलंबून असते लक्षात ठेवा.सद्याच्या या नकली दुनियेत खर आणि सत्य काय असेल तर ती फक्त पुस्तके. आणि ती वाचून मोठी होणारी माणसे.म्हणून सांगतो गोत्तमी पाटील च्या डान्सच्या गर्दीचा एक भाग होण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर सांडलेल्या मावळयाच्या रक्ताचा साक्षीदार होऊन जगता आल तर बघा.आयुष्याचे सोने होऊन राहिल्याशिवाय राहणार नाही.” यावेळी विविध अभ्यासपूर्ण कविता त्यांनी सादर करून सामाजिक प्रबोधन केले. दुपार सत्रात विद्यार्थ्यांसाठी शेलापागोटे व फनी गेम्स आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सत्रात उच्च माध्यमिक विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा संपन्न झाला. सर्व ठिकाणहून सुमारे पाचशेहून अधिक माजी विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक ,कवी ,व्याख्याते संजय कळमकर यांच्या उपस्थितीत होते. अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयीच्या आठवणी मनोगत मध्ये व्यक्त केल्या. सायंकाळी माजी विद्यार्थ्यांचा सदाबहार असा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
दि.३० डिसेंबर २०२४ रोजी गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांच्या पुण्यतिथी निमित्त माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सरांच्या प्रतिमेस आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी कादंबरीकार,समीक्षक व प्रा. डॉ. महेश खरात हे उपस्थित होते. सायंकाळच्या सत्रात कला वाणिज्य महाविद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. पाच दिवसाच्या या सांस्कृतिक महोत्सवाचा खारेपाटण परिसरातील विद्यार्थी पालक व नागरिकांनी आस्वाद घेतला. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन खारेपाटण हायस्कूलचे मुख्याद्याप संजय सानप,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे, पर्यवेक्षक संतोष राऊत, गुरसाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सर्व शिक्षकांनी केले. तर याला खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संचालकाचे उत्तम सहकार्य लाभले.















