माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये होणार जादूटोणा कायद्याचे व्याख्यान

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी काढले आदेश

अभाअंनिस शाखा सिंधुदुर्ग च्या मागणीला यश

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष ,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्यात अधिनियम 2013 थोडक्यात जादूटोणा विरोधी कायदा केला . या कायद्याच्या प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती ( PIMC ) सिंधुदुर्ग जिल्हामध्ये स्थापन झाली . या समितीचे सचिव तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती व प्रसार प्रचार होण्यासाठी सर्व शाळा ‘ कॉलेजमध्ये व्याख्याने आयोजित करावेत असे आदेश दिले होते . या आदेशाच्या अनुषंगाने तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी मा सुभाष चौघुले यांनी सर्व प्राचार्य , मुख्याध्यापक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा यांना सर्व शाळांमध्ये जादूटोणा विरोधी कायद्याचं व्याख्यान आयोजित करण्याचे पत्र दिले होते . मात्र मागील वर्षभरात शाळा , महाविद्यालयांमध्ये या कायद्याचे व्याख्यान आयोजित करण्यासाठी म्हणावा तसा प्रतिसाद शाळांकडून मिळाला नव्हता . सदरची बाब अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी मान . श्रीम. कविता शिंपी माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या निदर्शनास निवेदनाद्वारे आणून दिली होती . जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांची माहिती देऊन मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली होती . मा . माध्य. शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका गटशिक्षणाधिकारी तसेच प्राचार्य , मुख्याध्यापक , माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा यांना विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायद्याचे व्याख्यान आयोजित करण्यात यावे व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग या संस्थेला सहकार्य करावे असे आदेश नुकतेच काढले .अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मान . शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे आभार मानण्यात आले .तसेच असे व्याख्यान शाळांमध्ये आयोजित करण्यासाठी विजय चौकेकर जिल्हा संघटक ( 942097 4775 ) यांच्याशी संपर्क करावा . सदरचे व्याख्यान कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन कोणतेही मानधन न घेता देण्यात येईल . असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजीव बिले ‘ सचिव अजित कानशिडे ‘ जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!