महावितरण च्या अवेळी कारवाईने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता
कणकवली (प्रतिनिधी) : ऐन परीक्षांच्या तोंडावर कणकवली शहरातील शिवाजीनगर परिसरात महावितरणकडून अचानक मीटर कापण्याची कारवाई करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यामुळे परिसरातील अनेक घरे अंधारात गेली असून विशेषत: परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा खोळंब झाला आहे. ऐन अभ्यासाच्या काळातच वीजपुरवठा खंडित झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, या कारवाईबाबत विचारणा केली असता काही वायरमनकडून ही कारवाई कार्यालयीन आदेशानुसार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महावितरणच्या या बेजबाबदार कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.












