संजय बोंबडी यांची गटनेतेपदी निवड
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये भाजपाचा गट स्थापन करण्यात आला असून गटनेतेपदी संजय बोंबडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 7 फेब्रुवारी रोजी निकाल लागलेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपाने 50 पैकी 27 जागा जिंकून एकतर्फी बहुमत प्राप्त केले आहे. भाजपाच्या 27 जिल्हा परिषद सदस्यांचा गट आज स्थापन करण्यात आला असून एकमुखी संजय बोंबडी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपाचा गट स्थापन केल्याचे आणि गटनेतेपदी संजय बोंबडी यांची निवड केल्याचे पत्र देण्यात आले. यावेळी भाजपाचे नवनिर्वाचित सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.पुरळ मतदारसंघातून विजयी झालेल्या संजय बोंबडी यांच्या रूपाने देवगड तालुक्याला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये भाजपाचे गटनेतेपद मिळाले आहे. 2015 -16 साली बोंबडी याना जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती पदी काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर पुन्हा थेट गटनेतेपदी निवड करून पक्षश्रेष्ठींकडून संजय बोंबडी यांच्यावर विश्वास दर्शविला आहे.











