टोलविरोधात आम जनतेच्या सह्यांच्या मोहिमेला फोंडाघाटमधून सुरुवात
टोलमुक्त कृती समिती सहसचिव अनंत पिळणकर यांचा पुढाकार
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे या मागणीसाठी टोलमुक्त कृती समिती चे सहसचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या पुढाकाराने फोंडाघाट मधून सर्वसामान्य जनतेच्या सह्यांच्या मोहिमेला आज सकाळी सुरुवात करण्यात आली. यावेळी अनंत पिळणकर. नितीन म्हापणकर. हनीफ पीरखान , प्रकाश मडवी, बंडू शेणवी, देवेंद्र पिळणकर, अमित फोंडके, प्रशांत बोभाटे, गौरेश पारकर, उत्तम तेली, जयेश परब, सेनापती सावंत, विश्वजीत कर्णिक, संदीप सुतार, संतोष चव्हाण, बाळा मसुरकर, प्रकाश सावंत, अजय राणे, पांचू उर्फ विजय राणे, सागर होळकर, सुरेश निकम, तेजस पिळणकर, अनिल वाळवे, राजू ढवण आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अनंत पिळणकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नॅशनल हायवे चौपदरीकरणची कामे अद्याप अपूर्ण आहेत, ओसरगाव येथे उभारण्यात आलेल्या टोलनाका हा कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील वाहनचालकांची आर्थिक लुबाडणूक करणारा ठरणार आहे. जिल्हा मुख्यालय ओरोस येथे दैनंदिन कामासाठी ये जा करणाऱ्या आम जनतेला याचा नाहक आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
टोलनाक्यावर आवश्यक पब्लिक टॉयलेट, रेस्ट रूम सारख्या अत्यावश्यक सुविधा अद्याप उभारल्या नाहीत, मात्र टेंडर काढून टोलवसुली सुरू करण्यामागे प्रशासन लागले आहे.सिंधुदुर्गवासीयांवर अन्यायकारक असणाऱ्या या टोलनाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी सर्वसामान्य जनततेचा या लढ्यात सहभाग असावा म्हणून टोलनाक्याविरोधात ही सह्यांची मोहीम सुरू असल्याचे टोलमुक्ती कृती समितीचे सहसचिव अनंत पिळणकर यांनी सांगितले. आज सकाळी फोंडाघाट एसटी स्थानकात टोलमुक्तीच्या लढ्यात सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हावे यासाठी नागरिकांच्या सह्यांच्या मोहिमेतुन एल्गार करण्यात आला.फोंडाघाट पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी टोलनाक्याला विरोध असल्याचे आपल्या सह्यांच्या माध्यमातून दाखवून दिले.फोंडाघाट मधून सुरू झालेली नागरिकांच्या सह्यांची मोहीम जिल्ह्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. या सह्यांच्या मोहिमेतून टोलनाक्याला असलेला सर्वसामान्य जनतेचा विरोध प्रशासनाला दाखवून देण्यात येणार आहे.